खाद्यतेलाच्या किमतीने गाठला उच्चांक
By | Published: December 2, 2020 04:06 AM2020-12-02T04:06:18+5:302020-12-02T04:06:18+5:30
औरंगाबाद : एके काळी गरिबांसाठीचे सर्वात स्वस्त तेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामतेलाचे भाव चक्क १०५ रुपये प्रतिलिटरपर्यंत जाऊन ...
औरंगाबाद : एके काळी गरिबांसाठीचे सर्वात स्वस्त तेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामतेलाचे भाव चक्क १०५ रुपये प्रतिलिटरपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. यामुळे सरकी, सोयाबीन, सुर्यफूल तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. दुसरीकडे आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
मागील आठवड्यात करडी व शेंगदाणा तेलाचा अपवाद वगळता अन्य खाद्य तेलाच्या भावात लिटरमागे ५ ते १० रुपये भाववाढ झाली. यामुळे सूर्यफूल तेल १२५ रुपये, सोयाबीन तेल ११० रुपये, सरकी तेल ११० रुपये प्रतिलिटर पर्यंत जाऊन पोहोचले आहेत. ऐन लग्नसराई सुरू होताच खाद्य तेलाच्या किमतीने शंभरी पार केल्याने अनेकांचे बजेट बिघडले आहे. करडी तेल १६० ते १६५ रुपये, तर शेंगदाणा तेल १४५ ते १५० रुपये प्रतिलिटर भाव स्थिर आहेत. मागील आठवड्यात केंद्र सरकारने कच्च्या पामतेला (सीपीओ) वरील आयात शुल्क १० टक्क्यांनी कमी करून २७.५ टक्क्यांवर आणून ठेवले आहे. विशेष म्हणजे कच्चे तेल व सोन्यानंतर सर्वात जास्त पामतेल भारत खरेदी करतो. वर्षाला १.५ कोटी टन खाद्यतेल आयात करणारा भारत देश जगात सर्वात मोठा आयात करणारा देश आहे.
दुसरीकडे भाजीमंडईत पालेभाज्या स्वस्त मिळत आहेत. काही फळभाज्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. यामुळे शहरवासीयांचा ओढा जास्तीत जास्त पालेभाज्या खाण्याकडे दिसून आला.
चौकट
पालेभाज्या २२ नोव्हेंबर २९ नोव्हेंबर
फुलगोबी ३० ते ४० रु. १५ ते २० रु.
भरताचे वांगे ३० ते ४० रु. २० ते २५ रु.
दोडके ५० ते ६० रु. २० ते २५ रु. मेथीभाजी १५ रु. (२ जुडी), १० रु. (३ जुडी)
पालक ५ रु. (जुडी) ३ रु. (जुडी)
-------------
खाद्यतेल २२ नोव्हेंबर २९ नोव्हेंबर
(प्रतिलिटर)
पामतेल ९५ रु. १०५ रु.
सरकी तेल १०० रु. ११० रु.
सूर्यफूल तेल ११५ रु. १२५ रु.
सोयाबीन तेल १०५ रु. ११० रु.
शेंगदाणा तेल १५० रु. १५० रु.
-----
भाव कमी होतील
कच्च्या पामतेलावरील आयात शुल्क १० टक्क्यांनी कमी झाल्याने पामतेलाची आयात वाढेल व भाव कमी होतील. देशात मात्र तेलबियांच्या उत्पादन वाढीसाठी भाववाढ आवश्यक होती.
-भरत कसबेकर, खाद्य तेल विक्रेते
----
भाजीपाला मातीमोल
मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, चुका या भाज्या शेतकऱ्यांना १ ते २ रुपये जुडी या मातीमोल भावात विकाव्या लागत आहेत. शेतातून जाधववाडीत भाज्या आणण्यासाठी मालभाडेही त्यापेक्षा जास्त लागत आहे.
-हरिभाऊ सपकाळ, शेतकरी
---
महागाई आटोक्यात आणावी
महागाई आटोक्यात आणणे आवश्यक आहे. एकीकडे भाज्या स्वस्त झाल्या, तर दुसरीकडे खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत.
-शोभा देशपांडे, गृहिणी
पेरू, बोरांकडे ग्राहकांची पाठ
पेरू १० रुपये ते ६० रुपये किलोदरम्यान विकले जात आहेत. बोर २० ते ३० रुपये किलो विकत आहेत; पण पेरू खाल्ल्याने सर्दी होते व बोर खाल्ल्याने खोकला लागतो, असे म्हटले जात असल्याने सध्या ते खाण्याचा मोह आवरला जात आहे.
----