खाद्यतेलात न भूतो न भविष्यति तेजी; हरभरा, तूर डाळीत मंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 08:04 PM2020-12-21T20:04:08+5:302020-12-21T20:07:40+5:30
सूर्यफूल तेल व पामतेलाची आयात कमी झाली आहे. परिणामी देशाअंतर्गत खाद्यतेलाच्या किमती भडकल्या आहेत.
औरंगाबाद : आवक कमी झाल्याने सोयाबीन तेल, सरकी तेल, पामतेल व वनस्पती तुपाच्या भाववाढीने आतापर्यंतचा नवीन उच्चांक गाठला आहे. यामुळे न भूतो न भविष्यति एवढी तेजी आली आहे. फोडणी देण्यासाठी गृहिणी दहादा विचार करत आहेत. हरभरा डाळ व तूर डाळीत किलोमागे १० रुपयांची घसरण झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.
सूर्यफूल तेल व पामतेलाची आयात कमी झाली आहे. परिणामी देशाअंतर्गत खाद्यतेलाच्या किमती भडकल्या आहेत. मागील आठवड्यात लिटरमागे ५ रुपयांनी भाववाढ होऊन सोयाबीन तेल चक्क ११५ रुपये प्रतिलिटरपर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यापाठोपाठ सरकी तेल ११० रुपये, पामतेल ११० रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. आजपर्यंत या खाद्यतेलाचे भाव कधीच एवढे झाले नव्हते. पामतेल महागल्यामुळे वनस्पती तूपही किलोमागे ५ रुपयांनी वधारून ११० रुपये प्रतिकिलो विकल्या जात आहे. नवीन शेंगदाण्याची निर्यात होत असल्याने शेंगदाणा तेल लिटरमागे १० वधारून १५० ते १५५ रुपये लिटर विकत आहे. नवीन करडीची एप्रिलमध्ये आवक होईल.
ग्राहकांना दिलास
हरभरा डाळ व तूर डाळीच्या किमतीत किलोमागे १० रुपयांनी भाव घसरले आहे. हरभरा डाळ ५३ ते ५७ रुपये तर तूर डाळ ७८ ते ८२ रुपये प्रतिकिलो विकत आहे.- नीलेश सोमाणी, होलसेल व्यापारी
खाद्यतेलात भडका
आयात कमी झाल्याने खाद्यतेलात भाववाढीचा भडका उडाला आहे. लग्नासाठी ५० लोकांची मर्यादा घालून दिल्याने खाद्यतेलाच्या मागणीवर त्याचा परिणाम झाला. - जगन्नाथ बसैये, खाद्यतेल विक्रेते
भाज्यांमध्ये मंदी कायम
बटाटा जुना ३० रुपये, नवीन २५ रुपये, कांदा ३० रुपये, काकडी १० रुपये किलो, टोमॅटो २० रुपये किलो ग्राहकांना मिळत आहे. यापेक्षा ५ रुपये कमी भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. काकडी, पालेभाज्या शेतातून काढून आणणे परवडत नाही.- सखाराम शिंदे, शेतकरी
खाद्यतेलात तेजी
खाद्यतेल १३ डिसेंबर(लिटर) २० डिसेंबर
सोयाबीन तेल ११० रु. ११५ रु.
सरकी तेल १०५ रु. ११० रु.
पामतेल १०५ रु. ११० रु.
डाळीत मंदी
डाळी १३ डिसेंबर(किलो) २० डिसेंबर
हरभरा डाळ ६३- ६७ रु. ५३-५७ रु.
तूर डाळ ८८- ९२ रु. ७८-८२ रु.
गहू १९ - ३२ रु. २०-३३ रु.