शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचीच पैसे घेऊन नोकरी लावण्यासाठी मध्यस्ती, तरीही १० लाख रुपये घेऊन संस्थाचालकाचा तरुणाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:22 AM2019-01-03T00:22:01+5:302019-01-03T00:22:35+5:30
जोगेश्वरी येथील सिद्धिविनायक संस्था संचालित श्री विनायक विद्यालयात लिपिकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला १० लाखाला गंडा घालणाºया संस्था सचिवाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे ही नोकरी देण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकाºयांनीच तडजोड घडवून आणली होती.
वाळूज महानगर : जोगेश्वरी येथील सिद्धिविनायक संस्था संचालित श्री विनायक विद्यालयात लिपिकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला १० लाखाला गंडा घालणाºया संस्था सचिवाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे ही नोकरी देण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकाºयांनीच तडजोड घडवून आणली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम देवराव साबळे (३२, रा.औरंगाबाद) या तरुणाने एमबीएसह उच्च शिक्षण घेतलेले आहे. त्यांचे वडील देवराव साबळे यांनी त्यांचे नातेवाईक तथा शिक्षण विस्तार अधिकारी अनिलकुमार सकदेव (रा. सिडको वाळूज महानगर) यांच्या मार्फत सदर संस्थेचे सचिव बालचंद देवकते याची भेट घेतली. बालचंद देवकते याने लिपिक पदाच्या नोकरीसाठी १० लाख रुपयांची मागणी केली. जुलै २०१६ मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी सकदेव, विनायक विद्यालयाचे मुख्याध्यापक अतुल बल्लाळ यांच्या उपस्थितीत गौतम साबळे यांनी संस्थेचा सचिव देवकते याला १० लाख रुपये दिले. हे साबळे यांच्या सेवानिवृत्तीचे पैसे होते. पैसे मिळाल्यानंतर देवकते याने गौतम यांना विनायक विद्यालयात लिपिकपदी निवड झाल्याचे पत्र दिले होते. त्यानुसार गौतम साबळे हे शाळेतील विविध कार्यालयीन कामकाज पाहत होते. दरम्यानच्या कालावधीत वेतन व अॅप्रुव्हलसंदर्भात लिपिक साबळे यांनी संस्थेचा सचिव देवकते याच्याकडे विचारपूस केली असता तो माहिती देण्यास टाळाटाळ करीत होता.
‘त्या’ पदावर अगोदरच नियुक्ती
जोगेश्वरी येथील विनायक विद्यालयात नोकरी करीत असताना देवकते याने अगोदरच काचोळे नावाच्या व्यक्तीची लिपिकपदी निवड केल्याचे साबळे यांच्या लक्षात आले; मात्र देवकते याने काचोळे याचे प्रकरण न्यायालयात सुरू असून निकाल लागेपर्यंत साबळे यांना शिपाई म्हणून काम करावे लागेल, अशी अट घालत कामावरून कमी केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गौतम साबळे यांनी देवकते याच्याकडे पैशासाठी तगादा लावला असता देवकते याने मार्च २०१७ मध्ये इलाहाबाद बँकेचा १० लाखांचा धनादेश दिला होता; मात्र देवकते याने दिलेला धनादेश वटलाच नाही. या फसवणूकप्रकरणी संस्थेचा सचिव बालचंद देवकते याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.