औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून आज शैक्षणिक सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:52 AM2018-08-09T00:52:01+5:302018-08-09T00:53:51+5:30
मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुवार ९ आॅगस्ट रोजी शैक्षणिक सुटी जाहीर केली आहे. याविषयीचे पत्र विद्यापीठ प्रशासन, शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुवार ९ आॅगस्ट रोजी शैक्षणिक सुटी जाहीर केली आहे. याविषयीचे पत्र विद्यापीठ प्रशासन, शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहे.
औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शिक्षण उपसंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव आणि महापालिकेचे शिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
मराठा क्रांती मोर्चातर्फे औरंगाबाद जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गुरुवारी (दि. ९) एक दिवसाकरिता औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात यावीत, तसेच याविषयीचे आदेश आपल्या स्तरावरून तातडीने निर्गमित करून अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले.
यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी विद्यापीठातील विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये एक दिवसाची सुटी देण्याचा निर्णय घेतला. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी गुरुवारी शैक्षणिक सुटी असल्यामुळे कामकाज होणार नसल्याचे पत्रही काढले आहे.
जिल्ह्यातील शाळा बंद राहणार
४जिल्ह्याधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार शहरासह जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचे पत्र माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी काढले. या सुटीच्या दिवशीच्या अध्यापनाच्या तासिका इतर दिवशी अतिरिक्त तासिका घेऊन पूर्ण करण्याच्या सूचनाही डॉ. चव्हाण यांनी दिल्या. तसेच खासगी संस्थाचालकांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळविले आहे.
शांततेचे आवाहन
राज्यस्तरीय बंद शांततेत पाळावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने नागरिकांना बंद शांततेचे आवाहन केले आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, बंद शांततेत पाळण्यात यावा, शासकीय, खाजगी मालमत्तेचे नुकसान करण्यात येऊ नये, असे पोलिसांनी म्हटले आहे. याशिवाय शहरात शांततेसाठी तगडा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.
असा असेल पोलीस बंदोबस्त...
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, ६ सहायक आयुक्त.
३० पोलीस निरीक्षक, १०० सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि २ हजार ५०० पोलीस कर्मचारी, ६२ चौकात फिक्स पॉइंट
रॅपिड अॅक्शन फोर्सची एक तुकडी तर राज्य राखीव दलाच्या चार कंपन्या.
ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी ग्रामीण भागात १३४ पोलीस अधिकारी, १ हजार ५०० पोलीस कर्मचारी, ४०० होमगार्ड जवान आणि राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात केल्या.