ग्रामस्थाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या लाईनमनला शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:10 AM2017-12-20T01:10:08+5:302017-12-20T01:10:12+5:30
डीपी बदलण्यासाठी मदतीला गेलेल्या ग्रामस्थाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ग्रामस्थाच्या ‘मृत्यूस कारणीभूत ठरल्या’च्या आरोपाखाली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी लाईनमन विष्णू वाघला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डीपी बदलण्यासाठी मदतीला गेलेल्या ग्रामस्थाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ग्रामस्थाच्या ‘मृत्यूस कारणीभूत ठरल्या’च्या आरोपाखाली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी लाईनमन विष्णू वाघला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
औरंगाबाद तालुक्यातील करजंगाव शिवारातील रावसाहेब बोराडे यांच्या शेतातील विजेची डीपी जळाली होती. ती दुरुस्त करावी किंवा नवीन डीपी बसविण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी गाढेजळगाव येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात केली होती. त्या कार्यालयातील लाईनमन विष्णू श्यामराव वाघ यांनी नवीन डीपी बसवावी लागेल, असे सांगितले. त्यामुळे गावात वर्गणी गोळा करण्यात आली. जमा झालेल्या पैशातून डीपी घेण्यात आली. ११ नोव्हेंबर रोजी लाईनमन विष्णू वाघ डीपी घेऊन गावात आला. त्याने डीपीवर चढवण्यासाठी मदतीला येण्याचे आवाहन केल्यामुळे आठ ते दहा जण आले. शिवारातील नादुरुस्त डीपी काढण्यासाठी चंद्रभान पुंजाराम बोरुडे आणि सुभाष भेरे हे दोघेजण खांबावर चढले. तत्पूर्वी या दोघांनी लाईनमन वाघ यास वीज बंद आहे का अशी विचारणा केली असता वाघने वीजपुरवठा बंद आहे, असे सांगितले. दरम्यान वर चढलेले चंद्रभान बोरुडे यास वरच्या विजेच्या तारेला उलटा हात लावून बघ वीज बंद आहे का? असे सांगितले. चंद्रभान याने विजेच्या तारेस उलटा हात लावताच त्याला विजेचा धक्का लागला. यामध्ये त्याचे दोन हात आणि डाव्या पायाची मांडी जळाली आणि तो खाली कोसळला. गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे तो जागीच मरण पावला असल्याचे पुंजाराम बोरुडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून करमाड पोलीस ठाण्यात लाईनमन वाघ विरोधात भादंवि कलम ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक ए. बी. धडबे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सुनावणीवेळी सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये लाईनमन दोषी आढळल्यामुळे त्याला शिक्षा सुनावण्यात आली.