सिल्लोड तालुक्यात शिक्षणाचा बाजार
By Admin | Published: July 15, 2017 06:39 PM2017-07-15T18:39:24+5:302017-07-15T18:39:24+5:30
आपल्याच तालुक्यात प्रवेश मिळत नसल्याने व शिक्षणाचा बाजार झाल्याने पालक, विद्यार्थी रडकुंडीला आले आहेत.
श्यामकुमार पुरे/ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद/ सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात यावर्षी बारावीत ४ हजार ९१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रवेश कोटा ३ हजार १२० एवढाच असल्याने महाविद्यालयात प्रवेशासाठी जास्तीची रक्कम उकलण्यात येत आहे. आपल्याच तालुक्यात प्रवेश मिळत नसल्याने व शिक्षणाचा बाजार झाल्याने पालक, विद्यार्थी रडकुंडीला आले आहेत.
तालुक्यात ८ महाविद्यालये असून बहुतेक संस्थाचालकांनी जास्तीची फी घेऊन पर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. तर प्रवेश फुल्ल झाल्याचे सांगून अनेक विद्यार्थ्यांकडून काही महाविद्यालयात आर्थिक लूट केली जात आहे. अधिकृतरित्या १ हजार ७९३ विद्यार्थी विविध महाविद्यालयात प्रवेशासाठी चकरा मारत आहेत. यातच काही संस्थाचालकांनी गोरखधंदा सुरु करुन प्रवेशासाठी अधिक रक्कम उकळत स्वत:ची तुंबडी भरुन घेण्याचा सपाटा लावला आहे.
तालुक्यातील जवळपास सर्वच महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे प्रथम वर्षांचे प्रवेश बंद झाले आहेत. यामुळे प्रवेशाचा कोटाच शिल्लक नसल्याने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. प्रवेश मिळत नसल्याने पालक व विद्यार्थी भयभीत झाले आहे. तालुक्यात उत्तीर्णांच्या तुलनेत उच्च शिक्षण देणा-या महाविद्यालयांची संख्या अतिशय कमी आहे. शासनाने तुकड्या वाढवून द्याव्या किंवा दुसरी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
सिल्लोड तालुक्यातील एकूण महाविद्यालये व कोटा
एकूण महाविद्यालये ८
कला-१६८०
वाणिज्य-३६०
विज्ञान-१०८०
एकूण जागा-३१२०
उत्तीर्ण विद्यार्थी -४९१३
प्रवेश फुल्ल अनेक विद्यार्थी वेटिंगवर...
नवीन तुकडीचा प्रस्ताव पाठविण्यासाठी काही महाविद्यालयांनी प्रवेश फुल्ल झाल्यावरसुद्धा वेटिंगमध्ये १०० ते १५० विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करुन घेतले आहे. परवानगी मिळाल्यावर त्यांचे प्रवेश निश्चित केले जातील, अशी हमी विद्यार्थ्यांना दिली जात आहे.
पाच ते दहा हजारापर्यंत दर
अनुदानित महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी कला शाखेला ८१० रुपये, वाणिज्य -११२० व विज्ञान शाखेसाठी ३८५० रुपये अशी फी आहे, तर अनुदानित महाविद्यालयासाठी कला शाखेला २४१०, वाणिज्य -२७२०, विज्ञान शाखेला ५८५० अशी फी आहे. पण काही संस्थाचालक प्रवेश फुल्ल झाल्याची बतावनी करुन पाच ते दहा हजार रुपये जास्तीचे वसूल करीत आहेत.
बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थी
महविद्यालयात तालुक्यातील विद्यार्थ्यांनाच प्राधान्याने प्रवेश द्यावा, असा नियम आहे. पण काही महाविद्यालयात तालुक्यातील विद्यार्थी वगळून बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जादा पैसे घेऊन प्रवेश दिला जात आहे. त्यात काही विद्यार्थी नोकरदार, कर्मचारी आहेत.
परीक्षेलाच उघडते महाविद्यालयाचे दार
तालुक्यातील काही महाविद्यालयांमध्ये नियमित तासिका होतात. तर काही महाविद्यालयात होत नाही. वर्षभर केवळ आॅफिस सुरु असते. काही शिक्षक येतात. बसून राहतात. पण विद्यार्थी येत नाही. विद्यार्थी येतात केवळ परीक्षेला. परीक्षा आली की महाविद्यालयाचे दार उघडले जाते. प्रात्यक्षिक होते अन् शाळेच्या निकालाची टक्केवारी वाढते. यासाठी मात्र मोठा पैसा मोजावा लागतो.
सुविधा असेल तरच मिळेल परवानगी
ज्या महाविद्यालयात सर्व बेसिक सुविधा आहेत, त्यांचे जलदगतीने प्रस्ताव मागवून तुकड्या वाढवून देण्यासाठी ७ जुलै रोजी नवीन जीआर काढला आहे. त्यासाठी महाविद्यालयांना २० जुलैपर्यंत प्रस्ताव पाठवायचा आहे. ज्या महाविद्यालयाकडे बेसिक सुविधा आहेत, त्यांना तुकड्या वाढीची परवानगी मिळेलही, पण तालुक्यात असे बोटावर मोजण्याइतकेच महाविद्यालये आहेत. बाकी महाविद्यालयांचे काय, विद्यार्थ्यांचा प्रश्न कसा सुटेल, याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्ह्याकडे धाव
तालुक्यात प्रवेश मिळत नसल्याने काही विद्यार्थी जिल्ह्याच्या तर काहीनी परजिल्ह्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागत असल्याचे विदारक चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.