Education: नवे शैक्षणिक वर्ष दोन महिन्यांवर; राज्यात १७ हजारांपेक्षा जादा पदे रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 08:10 AM2023-04-19T08:10:48+5:302023-04-19T08:11:07+5:30
Education: प्राथमिक शिक्षकांच्या भरतीबाबत मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी सोमवारी राज्य शासनास दिले.
छत्रपती संभाजीनगर : प्राथमिक शिक्षकांच्या भरतीबाबत मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी सोमवारी राज्य शासनास दिले.
सुनावणीदरम्यान न्यायालयाचे मित्र ॲड. अजित घोलप यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, नवीन शैक्षणिक वर्ष (२०२३-२४) सुरू होण्यास अवघा दोन महिन्यांचा कालावधी राहिला असून, अद्याप जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती झालेली नाही. शिक्षकांची भरती हा ‘मूळ मुद्दा’ आहे, तर संबंधित शिक्षकांच्या पात्रतेविषयक (टीएआयटी) परीक्षा घेऊन शासनाने दि. २४ मार्च रोजी निकाल जाहीर केला असल्याचे सहायक सरकारी वकील प्रवीण पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
खंडपीठाच्या दि. २२ सप्टेंबर २०२२च्या आदेशानुसार शासनाने प्राथमिक शिक्षक भरतीसाठीच्या ‘टीएआयटी’ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने दि. १३ ऑक्टोबर रोजी खंडपीठात सादर केले होते. त्यानुसार सरकारी वकिलांनी वरीलप्रमाणे निवेदन केले. त्यावर खंडपीठाने शासनास वरीलप्रमाणे निर्देश दिले. या ‘सुमोटो जनहित याचिकेवर’ दि. २८ एप्रिल रोजी पुढील सुनावणी आहे.
टीएआयटीचा निकाल जाहीर, पण भरती कधी?
n२०१७ साली एकदाच टीएआयटी परीक्षा झाली होती. त्यानंतर ती परीक्षा झाली नव्हती. तेव्हापासून प्राथमिक शिक्षकांची भरती झालीच नाही.
nपरिणामी छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता राज्यात प्राथमिक शिक्षकांची जवळपास १७ हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत, असे यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान निदर्शनास आणून देण्यात आले.
nमात्र, खंडपीठाच्या दि. २२ सप्टेंबर २०२२च्या आदेशानुसार शासनाने परीक्षा घेऊन दि. २४ मार्च रोजी निकाल जाहीर केला आहे.