मजुरी करत शिक्षण, लष्करी सेवेने आयुष्याला कलाटणी; गोल्डन बॉय अविनाशने रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 11:41 AM2023-10-02T11:41:00+5:302023-10-02T11:41:46+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये सोनेरी कामगिरी करणारा बनला पहिला भारतीय पुरुष खेळाडू
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याचा सुपुत्र अविनाश साबळे याने चीनमधील हांगझाऊ येथे रविवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचताना ३,००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर ३,००० मीटर स्टीपलचेसमध्ये गोल्डन कामगिरी करणारा अविनाश साबळे हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. तसेच बीड जिल्ह्यातील मांडवा या गावातील २९ वर्षीय साबळेने हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदकही जिंकून दिले.
अविनाश साबळेने ३,००० मीटर स्टीपलचेस स्पर्धा आठ मिनिट १९.५० सेकंदात पूर्ण केली. तसेच त्याने आठ मिनिट २२.७९ सेकंदाचा आशियाई विक्रम तोडला. जो की, २०१८ मध्ये जकार्ता येथे इराणच्या हुसेन केहानी याने हा विक्रम केला होता.उल्लेखनीय बाब म्हणजे प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने सन्मानित अविनाश साबळे याने २०२२ मध्ये ऑगस्ट महिन्यात बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत केनियन खेळाडूंचे वर्चस्व मोडीत काढताना ३,००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. त्या वेळेसही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.
#गौरव_महाराष्ट्राचा चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा स्टार अॅथलीट अविनाश साबळे याने 3000 मीटर ट्रिपल चेस मध्ये सुवर्णपदक पटकावले तो क्षण! @MahaDGIPR@girishdmahajan@collectornandedpic.twitter.com/21FHMa1ZLx
— District Information Office, Nanded (@InfoNanded) October 2, 2023
लष्करात दाखल झाल्यानंतर मिळाली कलाटणी
अविनाश साबळे हा छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा प्रबोधिनीत होता. क्रीडा प्रबोधिनी सोडल्यानंतर त्याने अकरावी व बारावीचे शिक्षण मोलमजुरी करून केले. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा, यासाठी तो २०१५ मध्ये लष्करात दाखल झाला आणि त्याच्या कारकिर्दीला येथूनच कलाटणी मिळाली. २०१७ मध्ये जानेवारीत प्रथमच त्याने छत्तीसगढ येथील राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत १० कि.मी. शर्यतीत धावला. अविनाश प्रमोशन मिळावे, यासाठी २०१७ मध्ये स्टीपलचेसकडे वळाला व पहिले सुवर्ण त्याने २०१७ मध्ये चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले. २०१९ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अविनाशच्या नावावर नऊ राष्ट्रीय विक्रम आहेत. त्यात त्याने गोपाल सैनी यांनी १९८१ मध्ये टोकियोत केलेला आठ मि. ३०.८८ सेकंदाचा विक्रम मोडत २०१८ मध्ये भुवनेश्वर येथील राष्ट्रीय स्पर्धेत आठ मि. २९.८० सेकंदाचा नवीन विक्रम रचला होता.