एकीच्या शिक्षणावर दुसरीला नोकरी; संस्थाचालकाचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 05:01 PM2018-10-18T17:01:34+5:302018-10-18T17:02:18+5:30
एका महिलेचे शैक्षणिक कागदपत्र सादर करून दुसरीला सहशिक्षकपदी नेमणूक देत, शासनाची सुमारे २५ लाख रुपयांची फसवणूक केली
औरंगाबाद : एका महिलेचे शैक्षणिक कागदपत्र सादर करून दुसरीला सहशिक्षकपदी नेमणूक देत, शासनाची सुमारे २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थाचालकासह सात जणांविरोधात जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. २००६ ते २०१२ या कालावधीत कैसर कॉलनीतील अलमोबीन शिक्षण संस्थेअंतर्गत अलअसगरी उर्दू हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला.
संस्थाध्यक्ष असगरी बेगम सय्यद मोहंमद अली, उपाध्यक्ष नूरजहाँ बेगम वलीवोद्दीन, सचिव शेख मुबीन शेख शोएब, सहसचिव अक्तर खान हुसेन खान, कोषाध्यक्ष मोहसीन शेख शोएब, शेख नाजीमोद्दीन निहालोद्दीन आणि इम्रान खान फारुख खान अशी आरोपींची नावे आहेत. कैसर कॉलनी येथे आरोपींची अलमोबीन शिक्षण संस्थेअंतर्गत अलअसगरी उर्दू हायस्कूल आहे.
२००५ आर्शिया नाज मुब्बासीर ऊर रहेमान या सिल्लोड येथील डी. एड. कॉलेजमध्ये २००५ ते २०१३ या कालावधीत सहायक प्राध्यापक म्हणून काम करीत होत्या. २००६ साली आरोपींच्या संस्थेची सहशिक्षकपदाची जाहिरात वाचून नाज मुब्बासीर मुलाखतीसाठी उपस्थित होत्या. मुलाखतप्रसंगी त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या सत्यप्रती आरोपींना दिल्या होत्या. त्यांना नोकरीसाठी बोलावणे न आल्याने त्या सिल्लोडच्या कॉलेजमध्ये कार्यरत होत्या.
२०१३ ते आजपर्यंत त्या तनजीन इन्स्टिट्यूट आॅफ एज्युकेशन (बी.एड. कॉलेज) येथे कार्यरत आहेत. त्यांनी आरोपींच्या संस्थेत एकही दिवस काम केले नाही, ना त्यांनी बँकेत खाते उघडले, असे असताना त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रावर दुसऱ्याच महिलेचे छायाचित्र चिकटवून संस्थाध्यक्ष असगरीबेगम आणि अन्य आरोपी पदाधिकाऱ्यांनी कागदपत्र छायाचित्रातील महिलेचेच असल्याचे शासनास सादर करून त्यांना संस्थेत सहशिक्षिकापदी नोकरी दिल्याचे दाखविले. एवढेच नव्हे तर २००६ ते २०१२ या कालावधीत त्यांनी शासनाकडून त्या महिलेच्या नावे जवळपास २५ लाख रुपये वेतन उचलून फसवणूक केली. ही बाब समोर येताच सामाजिक कार्यकर्ता काझी मोहंमद मोईजोद्दीन खैसरमिया (रा. युनूस कॉलनी) यांनी जिन्सी ठाण्यात तक्रार दिली.