विकासकामाबरोबर ‘इमेज’चाही प्रभाव
By Admin | Published: October 19, 2014 12:10 AM2014-10-19T00:10:10+5:302014-10-19T00:21:22+5:30
उस्मानाबाद : विद्यमान आमदारांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांची दखल मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करताना घेतली आहे.
उस्मानाबाद : विद्यमान आमदारांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांची दखल मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करताना घेतली आहे. याबरोबरच रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या इमेजचाही मतदारांवर प्रभाव असल्याचे ‘लोकमत’ सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे. तब्बल ३७ टक्के नागरिकांनी मतदान करताना विकासकामांची दखल घेतल्याचे सांगितले असून, ४२ टक्के मतदारांनी उमेदवाराच्या प्रतिमेकडेही आकृष्ट झाल्याचे या सर्व्हेक्षणावेळी स्पष्ट केले आहे. बुधवारी जिल्ह्यातील चारही मतदारसंघात उत्साही तितक्याच शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले.
बहुतांश मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते निकालाचे आखाडे बांधण्यात व्यस्त आहेत. उद्या दुपारनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष मतदान करताना मतदारांनी नेमक्या कोणत्या मुद्यांचा विचार केला हे जाणून घेतले असता, प्रमुख उमेदवाराची विकासाची दृष्टी, विद्यमान आमदारांनी मतदारसंघात केलेली विकासकामे, उमेदवाराचा मतदारसंघात असलेला जनसंपर्क त्या माध्यमातून त्यााची उभी राहिलेली प्रतिमा, जातीय समीकरणे याबरोबरच प्रचार यंत्रणा याबाबी महत्वपूर्ण ठरल्याचे हे सर्व्हेक्षण सांगते. विधानसभा निवडणुकात मतदारांवर कोणत्या मुद्याचा विशेष प्रभाव होता असा प्रश्न नागरिकांना विचारला असता, तब्बल ४२ टक्के नागरिकांनी उमेदवाराची प्रतिमा पाहिली गेल्याचे ‘लोकमत’कडे स्पष्ट केले. ३७ टक्के नागरिकांनी विकासकामांचा मुद्दा महत्वपूर्ण ठरल्याचे सांगितले. १६ टक्के नागरिकांनी निवडणूक कालावधीत राबविलेल्या प्रचार यंत्रणेचा मतदारांवर प्रभाव पडल्याची कबली दिली. तर ५ टक्के नागरिकांनी प्रत्यक्ष मतदानावेळी जातीचा मुद्दा प्रभावी ठरल्याची कबुली या सर्व्हेक्षणावेळी दिली आहे.
उमेदवार तसेच विद्यमान आमदाराचा मतदारसंघात जनसंपर्क कसा आहे. मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते किती आग्रही असतात. दिलेली आश्वासने पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न होतो का? याबरोबर मतदारसंघातील शांतता व सद्भावनेचे वातावरण कायम ठेवण्यासाठी जो उमेदवार प्रामाणिक प्रयत्न करण्याची शक्यता आहे. अशाच्याच पाठीशी राहिल्याचे मत नागरिकांनी या सर्व्हेक्षणावेळी व्यक्त केले. विशेष म्हणजे जातीय समीकरणे पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात बाजूला पडल्याचेही या सर्व्हेक्षणावरुन स्पष्ट होत आहे. निवडणूक कालावधीत भव्य प्रचार रॅली, जंगी जाहीर सभा घेवून शक्तीप्रदर्शन करण्यावर बहुतांश उमेदवारांचा भर असतो. या माध्यमातून काठावर असलेला मतदार आपल्या बाजूने वळेल अशी त्यामागची भूमिका असते. मात्र प्रचारयंत्रणेतील या मुद्यांचा केवळ १६ टक्के मतदारांवर प्रभाव राहिल्याचेही या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून पुढे आले आहे.
निवडणूक प्रचारासाठी जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिग्गजांच्या जंगी प्रचारसभा झाल्या. मात्र तरीही राज्यस्तरीय मुद्याऐवजी स्थानिक मुद्याकडेच मतदारांचे लक्ष होते, असे या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून पुढे आले आहे. तब्बल ६८ टक्के नागरिकांनी मतदारसंघातील स्थानिक मुद्यांचा मतदारांवर प्रभाव होता असे स्पष्ट केले असून, ३२ टक्के नागरिकांनी मात्र राज्यस्तरीय मुद्देही प्रत्यक्ष मतदानावेळी प्रभावी ठरल्याचे सांगितले आहे.४
रविवारी निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत. विशेषत: रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधा पुरविताना त्यात अधिक दर्जेदारपणा आणण्यासाठी नव्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा ४१ टक्के नागरिकांनी व्यक्त केली आहे. बेरोजगारीचा प्रश्न सर्वच घटकांना चिंतेचा वाटतो. त्यामुळेच ३४ टक्के नागरिकांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण करण्यासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तरुणांबरोबरच महिलांच्या हाताला काम मिळाल्यास अनेक प्रश्नांची सोडवणूक होवू शकते. तसेच आपल्या भागातच हाताला काम मिळाल्यास जिल्ह्यातून पुणे, मुंबईला रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होईल, अशी आशाही या नागरिकांनी व्यक्त केली आहे. अनेक लोकप्रतिनिधी निवडणूक काळात विविध आश्वासने देतात. मात्र त्याची पूर्तता होत नाही. याबरोबरच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचे पुढील पाच वर्षे मतदारसंघात दर्शनही होत नसल्याच्या काही जणांच्या तक्रारी असल्याचे या सर्व्हेक्षणातून पुढे आले. नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी निवडणुकीनंतरही मतदारांशी संपर्क कायम ठेवावा अशी अपेक्षा १८ टक्के नागरिकांनी व्यक्त केली आहे. मतदान करताना जातीपातीच्या पलिकडे जावून एखाद्या पक्ष, उमेदवाराच्या पाठीशी राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी सर्व समाज घटकांचे हित जोपासण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत ७ टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे.