डॉक्टरांच्या सांस्कृतिक चळवळीची प्रभावी वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 06:50 PM2019-07-03T18:50:56+5:302019-07-03T18:53:27+5:30

औरंगाबादमधील डॉक्टर मंडळी थेट विदेशात नाट्यप्रयोगासाठी जात आहेत

Effective move of the doctor's cultural movement in Auranagabad | डॉक्टरांच्या सांस्कृतिक चळवळीची प्रभावी वाटचाल

डॉक्टरांच्या सांस्कृतिक चळवळीची प्रभावी वाटचाल

googlenewsNext
ठळक मुद्दे संगीत, नाटक, कविता क्लब अशी वेगवेगळी कला दालने याअंतर्गत सुरू झाली आहेत. लवकरच वाद्यप्रेमी डॉक्टरांसाठी ‘इन्स्ट्रुमेंटल डॉक्टर्स’ हा ग्रुप सुरू होणार

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : आजार, दवाखाना, शस्त्रक्रिया, एक्स रे, सिटीस्कॅन या सामान्य लोकांना धडकी भरविणाऱ्या आणि अत्यंत रुक्ष वाटणाऱ्या विश्वात डॉक्टर मंडळी मात्र २४ तास रमलेले असतात. या क्षेत्रात काम करणारा माणूसही तेवढाच निरुत्साही आणि रुक्ष असेल, असा सामान्यांमध्ये पसरलेला समज किती ‘गैर’आहे, हे शहरात डॉक्टरांनी सुरू केलेल्या सांस्कृतिक चळवळीच्या प्रभावी वाटचालीतून दिसून येते. १ जुलै या डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांच्या सांस्कृतिक जीवनाचा मागोवा घेतला असता, त्यांच्यातील कलाप्रेम, रसिकता तीव्रतेने दिसून येते. 

रोजच्या एकसुरी आयुष्यातून विरंगुळा मिळावा, डॉक्टरांमध्ये दडलेल्या कलाकाराला प्रोत्साहन मिळावे म्हणून आयएमएच्या सहकार्याने डॉ. अनंत कडेठाणकर यांनी पुढाकार घेऊन काही वर्षांपूर्वी डॉक्टरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेणे सुरू केले. सुरुवातीला फक्त संगीताच्या मैफलीपुरताच मर्यादित असलेला हा उपक्रम वाढत गेला आणि आता तर नाटक, कविता क्लब अशी वेगवेगळी कला दालनेही याअंतर्गत सुरू झाली आहेत.

आयएमए औरंगाबादचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सत्यनारायण सोमाणी, सचिव डॉ. यशवंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक समितीचे सचिव डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. अमृत महाजन काम पाहत असून, डॉ. कडेठाणकर प्रमुख मार्गदर्शक आहेत. कविता क्लबसाठी डॉ. कस्तुरी बाºहाळे, डॉ. प्रशांत सोनवतीकर काम पाहतात. 

सांस्कृ तिक वाटचालीतून सामाजिकता जपण्याचा प्रयत्नही या माध्यमातून होताना दिसतो. डॉक्टरांच्या समस्या, वास्तव ‘डॉक्टर मुलगा नको गं बाई’ या नाटकातून उत्तमपणे मांडण्यात आले आहे. नाट्यलेखनापासून ते अभिनयापर्यंत सगळ्या गोष्टी डॉक्टरांनीच केल्या असून, या नाटकाचे महाराष्ट्रभर अनेक प्रयोग झाले. या प्रयोगातून संकलित झालेला सर्वच निधी सामाजिक संस्थांना तसेच गरजू रुग्णांच्या वैद्यकीय खर्चासाठी वापरण्यात येतो. यातून कलाप्रेमी डॉक्टरांचे सामाजिक भानही दिसून येते. हे नाटक अतिशय लोकप्रिय झाले असून, सप्टेंबर महिन्यात नाटकाचा प्रयोग लंडन येथे होणार आहे. डॉक्टरांनी डॉक्टरांसाठी सुरू केलेल्या या सांस्कृतिक चळवळीमुळे आज अनेकांच्या कलेला बहर आला असून, औरंगाबादमधील डॉक्टर मंडळी थेट विदेशात नाट्यप्रयोगासाठी जात आहेत, हे कदाचित महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण असावे.

लवकरच वाद्यप्रेमी डॉक्टरांसाठी ‘इन्स्ट्रुमेंटल डॉक्टर्स’ हा ग्रुप सुरू करण्यात येणार असून, त्याअंतर्गत वाद्यांवर आधारित विविध कार्यक्रमही घेण्यात येतील. डॉक्टरांची ही सांस्कृतिक चळवळ अधिकाधिक व्यापक होऊन सर्वसामान्य रसिकांनाही त्यांच्यात सामावून घेणारी झाली, तर शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठीही हे चित्र नक्कीच सकारात्मक असेल. 

Web Title: Effective move of the doctor's cultural movement in Auranagabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.