पीपीई कीटचा कोरोना योद्ध्यांच्या शरीरावर परिणाम; हजारोंना निरोगी करणाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 07:58 PM2020-08-20T19:58:47+5:302020-08-20T20:00:52+5:30
घाटीत आतापर्यंत जवळपास ३२ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाच्या महामारीतून नागरिकांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करणारे डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दिवसातील अनेक तास सतत पीपीई कीट घालावे लागते. त्याचा साईड इफेक्टही आता त्यांना जाणवू लागला असून, त्यामुळे त्यांच्या अंगावर चट्टे पडून त्वचेला आजार जडतो आहे. हा प्रकार लक्षात येताच घाटी प्रशासनाने पीपीई कीट बदलले; परंतु आरोग्याच्या दृष्टीने इतर गोष्टींकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी कोरोना योद्ध्यांकडून होत आहे.
घाटीत आतापर्यंत जवळपास ३२ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली, असे मार्ड संघटनेने सांगितले. तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. निवासी डॉक्टरांनी १४ दिवस सेवा दिल्यानंतर त्यांना किमान ५ दिवस क्वारंटाईन केले पाहिजे; परंतु त्याकडे दुर्लक्ष होतेय, अशी ओरड होत आहे.
घाटीत तब्बल २७० चतुर्थश्रेणी कर्मचारी ५० वर्षांवरील आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना वॉर्डाऐवजी अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभाग, अशा नॉनकोविड रुग्णसेवेच्या ठिकाणी काम दिले जात आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी १३० कर्मचारी सेवा देत आहेत. २०८ पदे रिक्त असल्याने या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाच्या तणावाला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयात परिचारिकांना निवास आणि आहाराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
आधी लॅमिनेटेड, आता नॉन लॅमिनेटेड पीपीई कीट
पीपीई कीटमुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या अंगावर चट्टे आले. उकाड्यामुळे हा प्रकार झाला. ही बाब लक्षात येताच घाटी प्रशासनाने पीपीई कीट बदलले. आधी लॅमिनेटेड होते. यातून पाण्याचा एक थेंबही बाहेर येत नव्हता. आता नॉन लॅमिनेटेड पीपीई कीट वापरले जात आहे. त्यामुळे आता कोणताही त्रास होत नाही, असे प्रशासनाने सांगितले.
सॅनिटायझरही मिळत नाही
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली जात आहे. कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरही मिळत नाही. आरोग्याच्या काळजीसह सकस आहार मिळाला पाहिजे.
-रवींद्र दाभाडे, अध्यक्ष, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ
क्वारंटाईनचा कालावधी वाढवा
कोरोनासह आता नॉनकोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे एमबीबीएस डॉक्टर घेतले पाहिजेत. निवासी डॉक्टरांच्या क्वारंटाईनचा कालावधी किमान ५ ते ७ दिवस हवा.
-डॉ. आबासाहेब तिडके, अध्यक्ष, मार्ड
कर्मचाऱ्यांची वेळोवेळी तपासणी
घाटीतील डॉक्टर, परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी तपासणी केली जाते. त्यांच्या राहण्याची आणि आहाराची व्यवस्थाही आहे. पीपीई कीटमुळे उकाड्याने अंगावर चट्टे येण्याचा प्रकार काही कर्मचाऱ्यांत दिसून आला. पीपीई कीट बदलण्यात आल्याने आता हा प्रकार होत नाही.
-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
पीपीई कीट, मास्क दिले जातात
जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रमाणात पीपीई कीट, मास्क पुरविण्यात येतात. त्यांची अधूनमधून तपासणीही केली जाते. आजपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याने आरोग्याच्या दृष्टीने तक्रार केलेली नाही.
-डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक