राजकारणातील ‘अंडरकरंट’ प्रवाहित करण्यासाठी बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 04:28 PM2019-04-11T16:28:14+5:302019-04-11T16:31:19+5:30
वैयक्तिक पातळीवर एसएमएस, नातेवाईक, पाहुणे या माध्यमातून बैठकीसाठी निमंत्रित केले जात आहे.
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २१ तारखेपर्यंत प्रचाराची मुदत असून, ११ दिवस प्रचारासाठी राहिलेले आहेत. यादरम्यान ‘अंडरकरंट’ राजकारणासाठी बैठकींचे नियोजन करण्यात येत असून, मराठा समाजाने त्यामध्ये आघाडी घेतली आहे. समाज म्हणून ठोस निर्णय घेण्याबाबत बैठकांमध्ये विचारमंथन होत आहे. विशेष करून वैयक्तिक पातळीवर एसएमएस, नातेवाईक, पाहुणे या माध्यमातून बैठकीसाठी निमंत्रित केले जात आहे.
बैठकींचे सत्र सध्या ग्रामीण भागात सुरू आहे. शहरामध्ये पुढच्या आठवड्यापासून तयारी करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक आणि समाज या पार्श्वभूमीवरच या बैठकांचे नियोजन करण्यात येत असल्याची चर्चा आहे. या सगळ्या बैठकांच्या सत्रामध्ये शांतीगिरी मौनगिरी महाराजांच्या भूमिकेकडे राजकीय पक्षांतील प्रमुख उमेदवारांचे लक्ष लागले आहे. महाराज आणि जय बाबाजी परिवाराचे सर्व समाज समावेशक भक्त आहे. त्यामुळे महाराज काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. इतर समाज मतदारांच्या देखील छोटेखानी बैठका होत आहेत. त्यामध्येदेखील लोकसभा निवडणुकीचा अजेंडा राबविण्याबाबत चर्चा होत असल्याचे ऐकिवात आहे.
शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांतील मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सध्या जरी आपापल्या पक्षाचे उपरणे घालून उमेदवारांचा प्रचार करीत असले तरी समाज म्हणून त्यांनाही बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे. बैठकांचे स्वरूप व्यापक नसून छोटेखानीच असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वानुमते मोठा समाज मेळावादेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराजांनी अजून निर्णय घेतलेला नाही
शांतीगिरी मौनगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याची चर्चा सोशल मीडियात होती. याबाबत प्रचारप्रमुख राजेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महाराजांनी अजून काहीही निर्णय घेतलेला नाही. महाराज पाठिंबा देण्याबाबत जाहीरपणे भूमिका मांडणार आहेत. सोशल मीडियातील माहिती चुकीची असल्याचे ते म्हणाले.