जिल्ह्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:02 AM2021-07-09T04:02:11+5:302021-07-09T04:02:11+5:30
विकास राऊत औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर आठ जुलै रोजी दुपारी केंद्रीय अर्थ व वित्त खात्याचे राज्यमंत्री खा. ...
विकास राऊत
औरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर आठ जुलै रोजी दुपारी केंद्रीय अर्थ व वित्त खात्याचे राज्यमंत्री खा. डॉ. भागवत कराड यांनी जिल्ह्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प तरतुदींसह यावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे ‘लोकमत’जवळ स्पष्ट केले. खात्याचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी प्राथमिक माहितीनुसार आपल्या योजनांचे स्पष्टीकरण केले.
औरंगाबाद जिल्ह्यासाठी आणि शहरासाठी काय करता येईल, आपल्या काय संकल्पना आहेत, याबाबत राज्यमंत्री डॉ. कराड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्राचा मागील सहा महिन्यांपासून मी आढावा घेत आहे. सर्व उद्योग संघटना आणि उद्योजकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर डीएमआयसीमध्ये उभारले जावे, यासाठी भरीव तरतूद केंद्र शासनाकडून मिळेल, या दिशेने प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील.
विमानतळ विस्तारीकरण करण्यासाठी याआधीही केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आहे. आता त्याला आणखीन गती देता येईल. येथून आंतरराष्ट्रीय पातळीवर विमानसेवा कशा वाढतील, यात सर्वाधिक लक्ष घालणार आहे.
डीएमआयसीसाठी गुंतवणुकीचे प्रमाण वाढावे, नवीन उद्योग यावेत, येथील उपलब्ध सुविधांचे जगभर मार्केटिंग करण्यासाठी विशेष एजन्सी असावी, याबाबत उद्योग खात्याशी बोलून चर्चा करण्यात येईल. डीएमआयसीमध्ये मोठा उद्योग यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे ते म्हणाले.
औरंगाबाद - पुणे या महामार्गाचे रुंदीकरण करणे, तसेच औट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला गती मिळेल, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून पाठपुरावा करण्यात येईल. केंद्रात असल्यामुळे त्यांना भेटणे सहज शक्य होईल. केंद्रीय वित्त मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून अर्थ संकल्पात औरंगाबाद जिल्हा सर्व बाजूने यावा, असाच माझा प्रयत्न राहील, असेही डॉ. कराड म्हणाले.