शासनाचे प्रयत्न तोकडे; मराठवाड्यात पाच महिन्यांत ३९१ शेतकऱ्यांनी संपविले जीवन
By बापू सोळुंके | Published: June 17, 2023 04:08 PM2023-06-17T16:08:48+5:302023-06-17T16:09:28+5:30
अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापसालाही भाव मिळाला नाही. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत सापडला आहे.
छत्रपती संभाजीनगर : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न होत असल्याचा दावा केला जात असला तरी शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत. मागील पाच महिन्यांत मराठवाड्यात ३९१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
यात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील ९८, तर धाराशिव जिल्ह्यातील ८० शेतकऱ्यांचा समावेश आहे. गतवर्षी अतिवृष्टीसोबत संततधार पावसामुळे मराठवाड्यातील अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांच्या हाती खरीप हंगामात काहीच लागले नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी पेरणीवर केलेला खर्चही वाया गेला होता. शासनाने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली होती. मात्र, ही मदत अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी पदरमोड करून पीकविमा काढला होता. विमा कंपनी दरवर्षी मेअखेरपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देत असते; परंतु यंदा आतापर्यंत पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याचे पैसे दिले नाही.
अवकाळी आणि गारपिटीमुळे रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापसालाही भाव मिळाला नाही. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, शासनाच्या प्रयत्न अपुरे पडत असल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत मराठवाड्यातील ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाकडून प्राप्त झाली आहे.
निम्म्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या अनुदानास पात्र
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला शासनाकडून सानुग्रह एक लाख रुपये अनुदान देण्यात येते. मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी २३६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाच्या निकषात बसत असल्याने या शेतकऱ्यांच्या वारसांना अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली. ५७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र शासनाच्या निकषात बसत नसल्याने या शेतकऱ्यांच्या वारसांना अनुदान नाकारण्यात आले आहे, तर ९८ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची चौकशी महसूल आणि पोलिस विभागाकडून सुरू आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या?
औरंगाबाद --५०
जालना--- २५
परभणी-- ३२
हिंगोली-- १३
नांदेड-- ६४
बीड-- ९८
लातूर-- २८
धाराशिव--- ८०