उपचाराबरोबर समुपदेशनाने परावलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न; घाटीतील वार्धक्यशास्त्र विभागाने ज्येष्ठांना दिला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 07:32 PM2018-08-27T19:32:38+5:302018-08-27T19:35:40+5:30
विभागाच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
औरंगाबाद : घाटीत बाह्यरुग्ण विभाग, ‘आयसीसीयू’, ‘एमआयसीयू’मध्ये दाखल होणाऱ्या ज्येष्ठांचे प्रमाण अधिक आहे. ज्येष्ठांना भेडसावणाऱ्या सर्व आजारांवरील उपचारासाठी घाटी रुग्णालयाने वार्धक्यशास्त्र (जेरियाट्रिक्स) विभागाच्या माध्यमातून महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. विभागाच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) एमडी-वार्धक्यशास्त्र (जेरियाट्रिक्स) विषयात पदव्युत्तर या अभ्यासक्रमाची मंजुरी मिळविणारे घाटी रुग्णालय राज्यातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर देशातील तिसरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे.
‘जेरियाट्रिक्स’च्या या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने १७ जुलै २०१७ रोजी ‘एमसीआय’कडून पाहणी झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी मिळाली.
एकूण तीन जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. वृद्धांची सर्वांगीण काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार घेण्यासाठी, समुपदेशन, नातेवाईकांनी त्यांची अधिक काळजी कशी घ्यायची, यादृष्टीने हा अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. घाटीत २७ जुलै रोजी वार्धक्यशास्त्र विभागाच्या वॉर्डाचे उद्घाटन करण्यात आले. याठिकाणी ३० खाटांची सुविधा आहे. गेल्या काही दिवसांत १९ महिला आणि २० पुरुष ज्येष्ठांवर उपचार करण्यात आले. परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर हा वॉर्ड पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.
वृद्ध व्यक्तींना वयोमानानुसार मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, फॅक्चर, लघुशंकेवरील नियंत्रण कमी होणे, दमा, पॅरेलेसिस यासह विसरभोळेपणा, स्मृतिभ्रंश, हात थरथरणे, बडबड करणे, एकटेपणा, नैराश्य येणे आदी आजारांना सामोरे जावे लागते. मानसिक समुपदेशन करून त्यांचे परावलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न या विभागाद्वारे केले जात आहेत. देशात २० प्रादेशिक वार्धक्यशास्त्र केंद्र मंजूर झालेले आहेत. यामध्ये सध्या दोन महाराष्ट्रात आहेत. तिसरे केंद्र औरंगाबादला मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुनर्वसन केंद्र अथवा प्रशिक्षण केंद्रही मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आगामी कालावधीत केंद्र
वार्धक्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर म्हणाल्या, मुंबईत २०१२ मध्ये जेजे हॉस्पिटल येथे प्रादेशिक वार्धक्यशास्त्र केंद्र सुरू झालेले आहे. तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या नागपूर येथील महाविद्यालयात हे केंद्र स्थापन करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. वृद्धांना विशेष उपचार देण्यासाठी औरंगाबादेत हे केंद्र हवे, असा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी घाटी प्रशासनातर्फे देण्यात आला. घाटी रुग्णालयासही आगामी कालावधीत हे केंद्र मिळेल, अशी आशा आहे.