सिल्लोडमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत दरोड्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 03:14 PM2018-12-05T15:14:51+5:302018-12-05T15:16:04+5:30
माणिकनगर भवन येथील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न पोलिसांच्या गस्तीमुळे फसला.
सिल्लोड (औरंगाबाद ) : तालुक्यातील जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या माणिकनगर भवन येथील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न पोलिसांच्या गस्तीमुळे फसला.
बुधवारी (दि. 5) पहाटे तीनच्या सुमारास गस्तीवर असलेल्या सिल्लोड ग्रामीण पोलिसांना भवन येथील जिल्हा बँक शाखेच्या काही अंतरावर एक कार संशयादस्पद उभी दिसली. चौकशी करण्यासाठी पोलिस थांबले असता कारमध्ये चालक व पाठीमागे एक व्यक्ती बसलेला दिसला. पोलिसांना बघताच वाहन चालकाने कार सुरु करून पळ काढला.
पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता पिंपळगाव पेठ रस्त्याने एक ते दीड किलोमीटर चोरटे पळाले व कार रस्त्यात सोडून अंधारात कपाशी शेतातुन पसार झाले. गस्तीवर असलेल्या फौजदार संदीप सावले, चालक विकास नायसे, राठोड़ यांनी घटनेची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटिल, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांना दिली. त्यांनी अतिरिक्त पोलिस कर्मचारी पाठवून चोरट्यांचा शोध घेतला पण अंधाराचा फायदा घेवून चोरटे पसार झाले.
चोरटयानी या गुह्यात वापरलेली कार (एमएच.20.बीसी.2385) पोलिसांनी ताब्यात घेतली. कारमध्ये दोन लोखंडी कटर, चार लोखंडी कटवण्या, एक धारदार चॉपर, एक मोठा स्क्रू ड्रायव्हर अशी हत्यारे व कटरने कट केलेले 3 कुलूप सापडले.
पथक रवाना
सीसीटीव्ही फुटेजवरून फरार आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिस पथक रवाना झाले असून लवकरच आरोपीना जेरबंद करण्यात येईल.
- विशाल नेहुल, उपविभागीय पोलिस अधिकारी, सिल्लोड.