खासगी विद्यापीठांकडे जाणारे विद्यार्थी थोपविण्यासाठी प्रयत्न व्हावा: शैलेंद्र देवळाणकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 08:04 PM2024-08-24T20:04:50+5:302024-08-24T20:05:00+5:30
विद्यापीठ वर्धापन दिन : खासगी विद्यापीठांकडे जाणारे विद्यार्थी राेखायचे असतील, तर पारंपरीक अभ्यासक्रमात बदल करावा लागेल.
छत्रपती संभाजीनगर : अनुदानित अभ्यासक्रमांकडे पाठ फिरविणारे विद्यार्थी लाखो रुपये देऊन खासगी विद्यापीठांकडे का जात आहेत, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. परंपरागत शिक्षणाच्या सध्याच्या पॅटर्नला ब्रेक देऊन व्यवसायाभिमुख कोर्सचा गिअर टाकावा लागेल, नाहीतर भविष्यात सध्याच्या महाविद्यालयांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल, अशी चिंता उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा वर्धापनदिनाचा कार्यक्रम शुक्रवारी थाटात झाला.
ध्वजारोहणानंतर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यगृहात मुख्य सोहळा झाला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रख्यात ढोलकीसम्राट पांडुरंग अण्णासाहेब घोटकर यांना जीवनसाधना पुरस्कार, सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
उच्च शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर म्हणाले, सद्य:स्थितीत १९२८ महाविद्यालयांनी ‘नॅक’ मानांकन मिळवले असून दर्जाच्या बाबतीत देशात आपले राज्य अव्वल ठरले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही महाराष्ट्रच अन्य राज्यांसाठी ‘रोल मॉडेल’ ठरेल यात शंका नसली, तरी खासगी विद्यापीठे व विना अनुदानित महाविद्यालयांची संख्या वाढताना दिसत आहे. तिकडे जाणारे विद्यार्थी राेखायचे असतील, तर पारंपरीक अभ्यासक्रमात बदल करावा लागेल. अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. फुलारी यांनी केला. प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल संजय शिंदे, सतीश दवणे, सुधाकर चव्हाण, जिज्ञासा दांडगे यांच्यासह गुणवंत कर्मचारी, विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रा. पराग हासे यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आभार मानले.
उच्च शिक्षणात परिवर्तन गरजेचे : डॉ. कुलकर्णी
उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थाना काळानुसार बदलणे अत्यंत गरजेचे असून, स्पर्धेत टिकायचे असेल, तर परिवर्तन हाच एकमेव संकल्प ठेवावा लागणार आहे. उद्योग क्षेत्राला व आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी असलेले शिक्षण, संशोधनासाठी सज्ज व्हायला हवे, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी म्हणाले.
वाजवता-वाजवताच मरण यावे
दुसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या माझ्यासारख्या कलावंताला केवळ ढोलकीमुळेच सातासमुद्रापार कार्यक्रमांची संधी मिळाली. पन्नास वर्षांपासून मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम मला हत्तीचे बळ देणारे आहे. ढोलकी वाजवता-वाजवताच मरण यावे, या शब्दात भावना व्यक्त करून लोककलावंत पांडुरंग घोटकर यांनी उपस्थितांना अक्षरशः दंडवत घातला. यावेळी त्यांचे पुत्र कृष्णा मुसळे यांच्यासोबत ढोलकीवरील जुगलबंदीने रसिकांना खिळवून ठेवले.