छत्रपती संभाजीनगरात उद्धवसेना फोडण्याच्या प्रयत्नांना वेग! ६ माजी नगरसेवक, शेकडो पदाधिकारी फोडले
By मुजीब देवणीकर | Published: June 27, 2024 07:44 PM2024-06-27T19:44:52+5:302024-06-27T19:45:20+5:30
१९८८ पासून २०१५ च्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच दबदबा राहिला.
छत्रपती संभाजीनगर : मुंबईनंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरात भरघोस प्रतिसाद मिळाला. ठाकरे यांचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी शिंदेसेना सरसावली आहे. आतापर्यंत उद्धवसेनेचे २७ पैकी ६ माजी नगरसेवक शिंदेसेनेत गेले. पश्चिम, मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक पदाधिकारीही गेले. आणखी काही पदाधिकारी, माजी नगरसेवकांची यादी तयार करण्यात आली असून, विधानसभेपूर्वी त्यांचे मन वळविणे सुरू आहे. मात्र, निष्ठावंत अजिबात भूलथापांना बळी पडणार नाहीत, असा विश्वास उद्धवसेनेला आहे.
शिवसेनेचा दबदबा
१९८८ पासून २०१५ च्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच दबदबा राहिला. शिवसेना म्हणजे धगधगती ‘मशाल’ असे समीकरणच महापालिकेच्या राजकारणात बनले होते. २०१५ च्या मनपा निवडणुकीत ‘धुनष्यबाण’ चिन्हावर २७ नगरसेवक निवडून आले. ५ शिवसेना बंडखोर, अपक्षांनी नंतर पाठिंबा दिला. महापालिकेत एकट्या सेनेकडे ३२ नगरसेवक होते. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड झाले. सर्वांत अगोदर संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट, शिल्पाराणी वाडकर, राजेंद्र जंजाळ यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यानंतर माजी महापौर विकास जैन, गजानन बारवाल यांनी प्रवेश केला. अलीकडेच माजी सभागृहनेता गजानन मनगटे यांनीही शिंदेसेनेचा झेंडा हाती धरला. याशिवाय सातारा-देवळाई, पडेगाव, मिटमिटा, बजाजनगर आदी भागातील शेकडो पदाधिकाऱ्यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला. संघटन म्हणून पश्चिम आणि मध्यमध्ये उद्धवसेनेला मोठा धक्का बसला. शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचे निकटवर्तीय किंवा त्यांना मानणारे अधिक आहेत.
फोडाफोडी अधिक होणार
पूर्व, मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांना डोळ्यासमोर ठेवून फोडाफोडी व्यापक प्रमाणात करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदेसेनेच्या या प्रयत्नांना किती यश येईल, हे लवकरच कळेल.
निष्ठावंत अजिबात जाणार नाहीत
शिवसेना एक विचार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा क्षणभरही डोळ्यांसमोर आला तरी एकाही निष्ठावंताची उद्धव साहेबांना या परिस्थितीत सोडण्याची हिंमत होणार नाही. कोणीही कितीही प्रयत्न केले तरी उद्धवसेना एकसंघ राहील.
- नंदकुमार घोडेले, माजी महापौर, उद्धवसेना