मिनी मंत्रालयाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न; ‘पे अँड पार्क’, होर्डिंगसाठी जागा भाड्याने देणार
By विजय सरवदे | Published: August 31, 2022 12:09 PM2022-08-31T12:09:42+5:302022-08-31T12:10:40+5:30
मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे बघितले जाते; परंतु सर्वार्थाने जिल्हा परिषदेची आर्थिक बाजू दुबळी आहे.
औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाने ‘पे अँड पार्क’, जाहिरातींचे होर्डिंग लावण्यासाठी जागा भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.
मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे बघितले जाते; परंतु सर्वार्थाने जिल्हा परिषदेची आर्थिक बाजू दुबळी आहे. विविध योजना राबविण्यासाठी शासनाकडून निधी येतो. मात्र, जि.प.चा गाडा हाकण्यासाठी मिळणारे उत्पन्न अतिशय तुटपुंजे आहे. उत्पन्न वाढावे म्हणून आता मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी कंबर कसली असून, जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील जागेवर शहरात येणाऱ्या वाहनांसाठी ‘पे अँड पार्क’ ही योजना सुरू करणे, जाहिरात होर्डिंगसाठी जि.प.च्या जागांचा उपयोग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. सध्या शहरात खरेदीसाठी, चित्रपट पाहण्यासाठी चारचाकी, दुचाकीवर येणारे अनेकजण जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील जागेवर आपली वाहने उभी करतात. या फुकट्यांना आवर घालावा आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करता यावेत, यासाठी ‘पे अँड पार्क’ची योजना आखण्यात आली आहे. याशिवाय जि. प. मुख्यालय हे शहराच्या मध्यवस्तीत असून, तेथील जागांचा जाहिरातींसाठी चांगला वापर होऊ शकतो, हे गृहीत धरून जाहिरात होर्डिंगसाठी जि.प.च्या जागांचा वापर होऊ शकतो. त्यातून प्रशासनाला चांगले उत्पन्नही मिळू शकते. यासाठी एक एजन्सी नेमण्यात येणार आहे. लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
९ वाहनांचा केला लिलाव
मुख्यालयात धूळ खात पडून असलेल्या जिल्हा परिषदेच्या १२ ते १५ वर्षे जुन्या ९ वाहनांचा नुकताच लिलाव करण्यात आला आहे. त्यातून ३ लाख ६८ हजार १०० रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, लिलावाद्वारे ५ लाख ७७ हजार २७६ रुपये मिळाले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेला २ लाखांचा फायदा झाला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेला नवीन ४ गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांनी सांगितले.