अहं... छत्रपती शिवाजी महाराज चौकच म्हणायचं, नगरपालिकेनं झळकावले बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 11:31 PM2022-01-16T23:31:49+5:302022-01-16T23:40:35+5:30
शहरातील मुख्य मार्गावरील प्रत्येक चौकात महापुरुषांच्या नावे असलेल्या चौकांचा एकेरी उल्लेख टाळावा, अशी होर्डिंग्ज लावले आहेत.
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी हे राष्ट्राचे महापुरुष आहेत. जनामनात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्यामुळेच, छत्रपती शिवाजी महाराज की... म्हणताच नकळत ओढांवर जय येतंच. तर, बाबासाहेबांना आठवताच राज्यघटनेचा उल्लेख येतोच. म्हणूनच या प्रेरणादायी व्यक्तीमत्वांची नावं रस्त्यांना, कॉलेजला, विविध स्थळांना दिली जातात. अनेक गावांत महापुरुषांचे पुतळेही उभारण्यात आले आहेत. मात्र, अनकेदा या रस्त्यांचा, चौकांचा उल्लेख एकेरी भाषेत होत असतो. त्यामुळेच, औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर नगरपालिकेनं नागरिकांना पोस्टरद्वारे आवाहनच केलंय.
शहरातील मुख्य मार्गावरील प्रत्येक चौकात महापुरुषांच्या नावे असलेल्या चौकांचा एकेरी उल्लेख टाळावा, अशी होर्डिंग्ज लावले आहेत. तसेच दुकानदार व इतर व्यावसायिकांनी आपला पत्ता सांगताना लिहिताना या चौकांच्या नावाचा पूर्ण आदरातिर्थी उल्लेख करावा, असं आवाहन केलंय. त्यासाठी, नगरपालिकेनं होर्डिंग्जच झळकावले आहेत. गंगापूर नगरपालिकेने हिंदुसूर्य महाराणा प्रताप चौक, शिवाजी चौक नाही तर छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेडकर चौक नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असेच म्हणायचे, अशा आशयाचे बॅनर लावले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांसाठी एका सकारात्मक मेसेज जात असून, महापुरुषांच्या नावाबद्दल एकेरी उल्लेख थांबवण्यासाठी जनजागृती सुद्धा होत आहे. तर, नागरिकांकडूनही या निर्णयाचे कौतूक होत आहे.
गंगापूर नगरपालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेत महापुरुषांचा आदर करण्याचं नागरिकांना बजावलं आहे. नगरपालिकेच्या या निर्णयाचे कौतुक आणि स्वागत होत आहे. तसेच, इतर नगरपालिकांनी याचे अनुकरण करण्याचं सूचविण्यात येत आहे.