ईद-ए-मिलाद : मोहम्मद पैगंबरांच्या पवित्र पोशाखाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 05:43 PM2021-10-19T17:43:05+5:302021-10-19T17:49:46+5:30
पवित्र पोशाखाच्या दर्शनानंतर भाविकांनी उरूसात जाऊन जर जरी जर बक्ष यांच्या दर्गेत दर्शन घेतले.
खुलताबाद ( औरंगाबाद ) : 'ईद -ए -मिलादुन्नुबी'निमित्त ( Eid E Milad ) मोहम्मद पैगंबर ( Prophet Muhammad Paigambar) यांच्या पवित्र पोशाख व मिशीचा केस यांच्या दर्शनासाठी खुलताबादेत आज मंगळवारी भाविकांनी गर्दी केली होती.
खुलताबाद येथील हजरत जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्गाह मध्ये ७३० वर्षांपासून मोहम्मद पैगंबर यांचा "पैहेरान ए मुबारक" (पवित्र पोशाख) सुरक्षित चांदीच्या पेटीत जतन केलेला आहे. या पैहेरान मुबारकचे फक्त वर्षातून एकदाच फक्त ईद-ए-मिलादुन्नबीच्या दिवशी भाविकांना दर्शन घेता येते. सकाळी चार वाजेपासून तर रात्री उशिरापर्यंत सर्वासाठी दर्शनासाठी दर्गाहात ठेवला जातो. या पवित्र 'पैहेरान मुबारक' दर्शनासाठी देशभरातुन मुस्लीम भाविक येतात. त्याचबरोबर ख्वाजा बु-हानोद्दीन यांच्या दर्गातही मोहम्मद पैगंबर यांचा मिशीचा केस दर्शनासाठी आजच्या दिवशी ठेवला जातो. रात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी सुरू झाली होती. पहाटेच्या नमाजनंतर दर्शन रांग सुरू करण्यात आली. दिवसभर भाविकांनी पवित्र पोशाखाचे दर्शन घेतले. गेल्या पाच दिवसापासून खुलताबाद येथील शेख मुन्तजबोद्दीन उर्फ जर जरी जर बक्ष यांचा ७३५ वा उरूस सुरू असून आज ईद -ए -मिलादच्या दिवशी उरूसाची सांगता झाली. पवित्र पोशाखाच्या दर्शनानंतर भाविकांनी उरूसात जाऊन जर जरी जर बक्ष यांच्या दर्गेत दर्शन घेतले.
दर्गाह कमेटीच्या अध्यक्ष शरफोद्दीन रमजानी , सचिव मसीयोद्दीन यांनी सांगितले की, इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या पवित्र 'पैहेरान मुबारक' हा पवित्र पोशाख येथे ७३० वर्षापासून जतन केलेला आहे. सर्वसामान्य जनतेला दर्शनासाठी फक्त याच दिवशी ठेवला जातो. तर दर्गाह हजरत खाजा बुर्हानोद्दीन अवलिया या ठिकाणी मोहम्मद पैगंबर यांच्या पवित्र मु -ए- मुबारक (मिशीचे केस) हे भाविकांच्या दर्शनासाठी ठेवला जातो. या वेळी येण्याऱ्या भाविकांसाठी प्रसाद म्हणून गोड भाताचे वाटप केल्या जाते. दरम्यान, महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. प्रशांत बंब यांनी येथील दर्गेस भेट देऊन दर्शन घेतले. त्याचबरोबर दुपारी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे यांनी भेट दिली.