सलग दुसऱ्या वर्षीही ईदची नमाज ईदगाहवर होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:05 AM2021-05-08T04:05:31+5:302021-05-08T04:05:31+5:30
औरंगाबाद : मुस्लिम बांधव पवित्र रमजान महिन्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात. मागील वर्षी कडक लॉकडाऊनमुळे नमाज, इबादत आणि ...
औरंगाबाद : मुस्लिम बांधव पवित्र रमजान महिन्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात. मागील वर्षी कडक लॉकडाऊनमुळे नमाज, इबादत आणि विशेष बाब म्हणजे सर्वात मोठ्या ईदची नमाजही ईदगाह मैदानावर अदा करता आली नाही. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन धर्मगुरूंनी केले आहे. मुस्लिम बांधवांनी हळूहळू ईदची तयारी करण्यास सुरुवात केली आहे.
एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हात यंदा रमजान महिना होता. मात्र, शहराचे तापमान ४० अंशांपेक्षा पुढे गेले नाही. त्यामुळे रोजेदार बांधवांना फारसा त्रास झाला नाही. अत्यंत आनंदाने मुस्लिम बांधवांनी यंदा रमजान साजरे केले. लॉकडाऊन असतानाही प्रशासनाने सायंकाळी दिलेली सूट मोलाची होती. शुक्रवारी मुस्लिम बांधवांनी अलविदा रमजानची शुक्रवारची विशेष नमाज अदा केली. यंदा २९ रमजान होतील, असा कयास लावण्यात येत आहे. असे झाल्यास १३ मे रोजी ईद साजरी करण्यात येईल. १३ रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यास १४ मे रोजी ईद साजरी होईल. रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात कोरोना मुक्तीसाठी दुवा केली. आता मुस्लिम बांधवांना ईदचे वेध लागले आहेत. अनेकजण ईद साध्या पद्धतीने साजरी करणार आहेत. कोरोनाने अनेक कुटुंबांमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. आपल्या जवळच्या आणि आसपासच्या अनेक नागरिकांना कोरोनाने हिरावून नेले. अशा परिस्थितीत ईद साजरी तरी कशी करावी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सामान आणि सुकामेवा खरेदी करण्यावर नागरिकांनी भर दिला आहे. घरातच अत्यंत छोटेखानी स्वरूपात ईद साजरी करण्यात येणार आहे.
मानवी कल्याणासाठी दुआ करावी
संपूर्ण जग महामारीने त्रस्त आहे. अल्लाहने महामारीपासून संपूर्ण मानव जगताला सुरक्षित ठेवावे, यासाठी महिनाभर दुवा करण्यात आली. या अतिशय कठीण परिस्थितीतून सृष्टीच्या निर्माणकर्त्याने सर्वांना बाहेर काढावे. अशा परिस्थितीत गोरगरिबांना जकात अदा करावी. ईद अत्यंत साधेपणाने साजरी करावी.
- माैलाना नसीम मिफ्ताही.