विद्यापीठात ५ भाषा, ११ लिप्यांतील दुर्मिळ हस्तलिखितांची तब्बल साडेआठ लाख पाने संकटात
By योगेश पायघन | Published: January 24, 2023 07:45 PM2023-01-24T19:45:06+5:302023-01-24T19:47:24+5:30
उपलब्ध पोथ्यांमध्ये गद्य, पद्य अशा मोथ्यांतून पं. म्हाईंभटांच्या लीळाचरित्रातून १२ व्या शतकातील समाजाचे प्रतिबिंब उमटलेले आढळते.
औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्रातील दुर्मीळ हस्तलिखितांच्या दालनातील साडेआठ लाख पानांना डिजिटलायझेशनची आस लागली आहे. रामायण, महाभारत, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, उपनिषद, पुराण, पोथ्यांच्या २४१४ हस्तलिखितांच्या संग्रहासाठी स्वतंत्र दालन २०१३ मध्ये झाले. मात्र, ५ भाषा ११ लिप्यांतील या अमूल्य ठेव्याला राष्ट्रीय वारसा संरक्षण, संवर्धन, डिजिटलायझेशन हब बनवण्यासाठी ४ कोटी ६२ लाख रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे.
उपलब्ध पोथ्यांमध्ये गद्य, पद्य अशा मोथ्यांतून पं. म्हाईंभटांच्या लीळाचरित्रातून १२ व्या शतकातील समाजाचे प्रतिबिंब उमटलेले आढळते. महानुभाव संप्रदाय हा मराठी भाषेच्या आरंभीचा एक महत्त्वाचा संप्रदाय असल्याने या हस्तलिखितांना सामाजिक महत्त्व प्राप्त होते. शके १४०० ते १७०० व्या शतकातील वर्णन असलेल्या हस्तलिखितात महाराष्ट्रातील इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत. मराठी, हिंदी, संस्कृत उर्दू, पंजाबी भाषांतील हस्तलिखितांमध्ये देवनागरी, सकळ, मोडी, सुंदरी, अंक इ. ११ लिप्यांचा समावेश आहे. विशेषज्ञांकडून या पानांचे रासायनिक संवर्धन करून चिकटलेली पाने वेगळी करून त्यात विशिष्ट प्रकारची पाने ठेवावी लागतील. त्यानंतरच त्याचे स्कॅनिंग शक्य होणार असल्याचे ज्ञान स्रोत केंद्राकडून सांगण्यात आले.
कुलगुरूंचे प्रयत्न सुरू
इतिहास विभागास यापूर्वी मिळालेला निधी अखर्चित असल्याने ‘काळ्या यादी’त होता. या यादीतून काढून नवा प्रकल्प केंद्राकडून मिळवण्यासाठी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. त्यासंदर्भात सांस्कृतिक संचालनालयाच्या सचिवांशीही त्यांनी चर्चा केली. हे काम केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानानंतरच शक्य होईल.
असा आहे समृद्ध ठेवा...
एकूण हस्तलिखिते -३४१४
सचित्र हस्तलिखिते -२४
शीलालेख ठसे -९२
मराठी शीलालेखांचे ठसे -१८
पुरातन वास्तू -४८
सनद (पत्रे) -३९
डिजिटलायझेशन गरजेचे
इतिहासातील अमूल्य हस्तलिखितांचा ठेवा ज्ञान स्रोत केंद्रातील स्वतंत्र दालनात आहे. या वारशाला अधिक काळ जतन, संवर्धन करण्यासाठी त्याचे डिजिटलायझेशन गरजेचे आहे. निधी मिळाल्यास ज्ञान साधक, संशोधकांना या ज्ञानभांडाराचा लाभ घेता येईल.
-डाॅ. धर्मराज वीर, संचालक, ज्ञान स्रोत केंद्र, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
काय आहे प्रस्ताव ?
जतन, संवर्धन आणि डिजिटलायझेशन कार्य - १ कोटी रु.
हस्तलिखितांसाठी आर्ट गॅलरीचा विकास आणि दुर्मीळ पुस्तके- २.५ कोटी रु.
संवर्धन आणि डिजिटलायझेशन उपकरणे - ५० लाख रु.
फर्निचर -५० लाख रु.
मनुष्यबळाचा खर्च -१२ लाख रु.
एकूण अंदाजपत्रक -४ कोटी ६२ लाख रु.