एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले; संपात होते सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:13 PM2018-06-21T12:13:45+5:302018-06-21T12:14:06+5:30
८ आणि ९ जून, असे दोन दिवस पुकारलेल्या अघोषित संपात सहभागी झालेल्या राज्यातील १,१४८ कर्मचाऱ्यांना महामंडळाने बुधवारी कामावरून काढले आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेच्या वतीने वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी ८ आणि ९ जून, असे दोन दिवस पुकारलेल्या अघोषित संपात सहभागी झालेल्या राज्यातील १,१४८ कर्मचाऱ्यांना महामंडळाने बुधवारी कामावरून काढले आहे. यात औरंगाबाद विभागातील ८ कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे विभागीय नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या वाढत्या दरामुळे देशात डिझेलचे दर गत वर्षभरात ११ ते १२ रुपयांनी वाढले आहेत. याचा परिणाम परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावरही झाला आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांना नुकतीच वेतनवाढ जाहीर केली होती. मात्र, वेतनवाढ देताना जाचक अटी आणि शर्ती लावण्यात आल्याचा आरोप करून महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना आणि इंटक यांच्या वतीने ८ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. अघोषित संपामुळे एसटीची चाके थांबली होती.
औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकासह सिडको स्थानकात पहिल्या दिवशी परिणाम जाणवला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळपासून वाहतूक सेवा पूर्णत: ठप्प झाली होती. संपाची कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना महामंडळाने कामावरून काढून टाकण्याचा निर्णय बुधवारी घेतला. यात औरंगाबाद विभागातील आठ आगारांतील आठ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी दिली.