आठ मान्यवरांना ‘जीवनगौरव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:38 AM2018-08-24T00:38:59+5:302018-08-24T00:40:08+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रात महनीय कार्य केलेल्या आठ जणांना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रात महनीय कार्य केलेल्या आठ जणांना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठ प्रशासनाने यावर्षी आठ व्यक्तींना वर्धापन दिनानिमित्त जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्याची घोषणा केली होती. यात मानवी मैला वाहून नेणाऱ्यांसाठी काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिंदेश्वरी पाठक, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं. बोराडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी भीमसेनानी तुकाराम जनपदकर गुरुजी, एका वृत्तपत्राचे प्रमुख डॉ. प्रताप पवार, बुलडाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे, ग्रामसुधारक भास्कर पेरे आणि साहित्य अकादमीचा पुरस्कारप्राप्त नामदेव कांबळे आदींचा समावेश होता. या सर्व व्यक्तींना प्रदान केलेल्या मानपत्राचे वाचन करून सन्मानित करण्यात आले. यातील डॉ. प्रताप पवार यांचा पुरस्कार त्यांच्या स्थानिक प्रतिनिधीने स्वीकारला. यावेळी पुरस्कारप्राप्त प्रत्येक व्यक्तीने मनोगत व्यक्त करीत विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी विद्यापीठातील अनेक उपक्रम हे देशात पहिल्यांदाच सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले. यात इन्क्युबेशन सेंटर हे देशातील केवळ ५० विद्यापीठांमध्ये असून, त्यात आपल्या विद्यापीठाचा समावेश होत असल्याचे सांगितले. तसेच पुरस्कार देण्यामागची कारणे स्पष्ट केली. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी प्रस्ताविक केले. यात त्यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी केले, तर प्रभारी कुलसचिव साधना पांडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे, प्राचार्य डॉ. भागवत कटारे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, विभागप्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाजनिर्मितीसाठी प्रयत्न
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिंदेश्वरी पाठक म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निवारणासाठी एकच मंदिर, तलाव, विहीर आणि एकत्र जेवण हा उपाय सांगितला होता. याच तत्त्वावर काम करीत मैला वाहून नेणाºयांसाठी आयुष्य वेचले असल्याचे सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांनी आपल्या आठवणी सांगितल्या. ज्या विद्यापीठात शिक्षण घेतले. लिहिण्याचे धडे गिरवले, त्या विद्यापीठाकडून होणारा सन्मान ही सर्वांत सुखदायी बाब आहे. गेल्या ६१ वर्षांपासून लिहितो आहे. आताही लिहिणे थांबवलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात विविध स्तरावर व्यक्ती कार्य करीत असल्यामुळेच हा गाडा विकासाकडे जातो. त्यात प्रत्येकाने हातभार लावल्यास विकासाला आणखी गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी तुकाराम जनपदकर गुरुजी, राधेश्याम चांडक, डॉ. राजेंद्र शेंडे, भास्कर पेरे आणि नामदेव कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. प्रताप पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
वर्धापन दिनी मानापमाननाट्य
विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांचे नाव टाकले होते. मात्र, भाजपशी संबंधितच विद्यापीठ विकास मंचतर्फे व्यवस्थापन परिषदेवर निवडून आलेले संजय निंबाळकर, डॉ. शंकर अंभोरे यांनी कुलगुरूंकडे तक्रार करीत एकाच सदस्याचे नाव टाकण्यास विरोध दर्शविला. यामुळे कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी बॅनर, पत्रिका बदलण्यात आल्या.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला इतर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्यासपीठावर बसले होते. मात्र, किशोर शितोळे यांनी प्रेक्षकांमध्ये बसून कार्यक्रम पाहिला. त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले. मात्र, त्यास त्यांनी नकार दर्शविला. यामुळे विद्यापीठ विकास मंचतर्फे किशोर शितोळे यांचे खच्चीकरण करण्यात येत असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती. दरम्यान अभाविपचा कार्यकर्ता असल्यामुळे मागे बसून कार्यक्रम पाहण्याची शिकवण असल्याचे शितोळे यांनी सांगितले.