आठ वर्षांनंतरही औसा-लातूर रस्ता खड्ड्यातच !
By Admin | Published: November 10, 2014 11:40 PM2014-11-10T23:40:35+5:302014-11-10T23:57:58+5:30
रमेश शिंदे ,औसा औसा- लातूर हा २० कि.मी.चा रस्ता चौपदरी करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली. त्यानंतर आठ वर्षांपूर्वी त्यांच्याच हस्ते या रस्ता कामाचे उद्घाटनही झाले.
रमेश शिंदे ,औसा
औसा- लातूर हा २० कि.मी.चा रस्ता चौपदरी करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली. त्यानंतर आठ वर्षांपूर्वी त्यांच्याच हस्ते या रस्ता कामाचे उद्घाटनही झाले. परंतु, अद्यापही औसा-लातूर हा रस्ता खड्ड्यातच आहे. हा रस्ता कधी पूर्ण होईल, याकडे अशी अपेक्षा प्रवाशांसह वाहनधारकांतून होत आहे़
औसा हा लातूरला सर्वात जवळचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याबरोबरच परिसरातील नागरिक व वाहनधारकांचा दररोज लातूरशी संपर्क असतो़ त्याचबरोबर लोहारा, उमरगा व निलंगा तालुक्यासह कर्नाटक राज्यातील शेतीमालही लातूरच्या बाजारपेठेत येतो. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना त्यांनी हा रस्ता चौपदरी करण्याची घोषणा केली. बांधा वापरा व हस्तांतरीत करा, या योजनेअंतर्गत या रस्त्याचे कामही सुरू झाले. पण त्यानंतर अचानक हे काम बंद पडले. त्यानंतर जो कंत्राटदार हे काम करीत होता, त्याच्यात आणि यंत्रणेतही बेबनाव झाला आणि या वादात मागील आठ वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना आदळआपट सहन करावी लागत आहे. हे काम आता दुसऱ्या कंत्राटदारास सुटले असून, या कामाची सुरुवातही झाल्याचे सांगण्यात येते़ दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. मागील आठ वर्षांमध्ये शंभरपेक्षा अधिक लोकांना अपघातात जीव गमवावे लागले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होऊनही आठ वर्षे या रस्त्याचे काम रखडले आणि आठ वर्षानंतरही औसा-लातूर रस्ता मात्र खड्ड्यातच आहे. हा रस्ता पूर्ण कधी होणार आणि औसा-लातूर हा प्रवास सुखकर कधी होणार, याकडे मात्र प्रवाशांचे लक्ष लागले आहे.