दिल्लीहून रेल्वे, विमानातून आलेले आठ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:55 IST2020-12-02T17:48:26+5:302020-12-02T17:55:29+5:30
दिल्लीहून रेल्वे आणि विमानाने औरंगाबादेत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे.

दिल्लीहून रेल्वे, विमानातून आलेले आठ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
औरंगाबाद : दिल्लीहून सचखंड एक्स्प्रेसने आलेल्या २६७ प्रवाशांची सोमवारी औरंगाबाद रेल्वेस्थानकावर तपासणी करण्यात आली. त्यातील तब्बल आठ प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली.
दिल्लीहून रेल्वे आणि विमानाने औरंगाबादेत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक प्रवाशांची तपासणी महापालिकेकडून करण्यात आली आहे. सोमवारी सचखंड एक्सप्रेसने शहरात २६७ प्रवासी रेल्वेस्थानकावर दाखल झाले. सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल आज महापालिकेला प्राप्त झाला. त्यातील आठ प्रवासी पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
मंगळवारी सचखंड एक्सप्रेसने १९७ प्रवासी दाखल झाले. त्यांच्या लाळेचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी त्याचा अहवाल प्राप्त होईल. मंगळवारी चिकलठाणा विमानतळावर दिल्लीहून आलेल्या तब्बल ५१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. सोमवारी ज्या प्रवाशांची तपासणी केली होती, त्यापैकी कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही. दिल्लीत ज्या पद्धतीने कोरोना पसरत आहे, त्यामुळे तेथील व्हायरस अत्यंत गंभीर स्वरूपाचा असू शकतो, असा अंदाज महापालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केला. या व्हायरसने औरंगाबाद शहरात शिरकाव केल्यास परिस्थिती बिकट होऊ शकते, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.