फुलंब्री तालुक्यातील तीन वस्तीशाळांवर प्रत्येकी आठ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:05 AM2021-06-10T04:05:02+5:302021-06-10T04:05:02+5:30

फुलंब्री : ग्रामीण भागातील शिक्षण विभागाने अनेक ठिकाणी चुकीचे नियोजन केल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असताना ...

Eight students each at three dormitories in Fulbari taluka | फुलंब्री तालुक्यातील तीन वस्तीशाळांवर प्रत्येकी आठ विद्यार्थी

फुलंब्री तालुक्यातील तीन वस्तीशाळांवर प्रत्येकी आठ विद्यार्थी

googlenewsNext

फुलंब्री : ग्रामीण भागातील शिक्षण विभागाने अनेक ठिकाणी चुकीचे नियोजन केल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असताना फुलंब्री तालुक्यातील २९ वस्तीशाळांमध्ये २० विद्यार्थ्यांपेक्षाही कमी विद्यार्थी शिकतात. तर तीन वस्तीशाळांमध्ये प्रत्येकी आठ विद्यार्थी असून, त्यांच्यासाठी दोन शिक्षक रुजू आहेत. एकतर दर्जात्मक शिक्षणात जिल्हा परिषदेच्या शाळा कोसोदूर राहत आहेत, यामुळे शेतवस्त्यांसह गावातील अनेक नागरिक आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी खासगी शाळांकडे वळत आहेत. याचे सर्व श्रेय शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियोजनाला आहे.

१९९५ ते २००० या वर्षांदरम्यान ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा कमी होत्या व विद्यार्थी संख्या वाढत होती. या काळात वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या कुटुंबाच्या मुलांना प्राथमिक शिक्षणासाठी दूर जाण्याची गरज भासू नये म्हणून शासनाने २००१ मध्ये वस्तीशाळा सुरू केल्या. सुरुवातीला या शाळांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने असल्याने त्यांना प्रतिसादही चांगला होता. १३ वर्षांनंतर २०१४ मध्ये या शाळांचे रूपांतर शासनाने प्राथमिक शाळेत केले. फुलंब्री तालुक्यात आजघडीला एकूण ७० वस्तीशाळा आहेत. दर्जा व गुणात्मक शिक्षणात जिल्हा परिषदेच्या शाळा सध्या मागे पडल्यामुळे पालकांचा ओढा आता खासगी शिक्षणाकडे वळला आहे. यामुळे जि. प.च्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटली आहे. फुलंब्री तालुक्यातील भीमवाडी, डाबरी वस्ती व गारगोटी वस्ती अशा तीन शाळांमध्ये प्रत्येकी ८ विद्यार्थी आहेत, तर येथे प्रत्येकी दोन शिक्षक कार्यरत आहेत.

चौकट

२९ वस्ती शाळांमध्ये २० पेक्षाही कमी विद्यार्थी

फुलंब्री तालुक्यात असलेल्या ७० वस्तीशाळांपैकी २९ शाळांमध्ये आजघडीला २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. यात रामपूरवाडी, माठपाटी, एकघर पाडळी, काळेवस्ती, पाथरी वस्ती, केजभटवस्ती, वाघवस्ती, शिवराम बाबा वस्ती, भाकरखाणे वस्ती, देवाचीवाडी वस्ती, शिव वस्ती, रामनगर वस्ती, शेवता, ढोके वस्ती, गुमसताळा, दत्त वस्ती, दत्तवाडी वस्ती, पाडळी, सीताबाई वाडी, वडाची वाडी, लहानेवादी, लालपाटी, रामपूरवाडी, फालकेवस्ती, तिवसवस्ती, आहेरवाडी, निमोनिवाडी आदी वस्तीशाळांचा समावेश आहे.

कोट

तालुक्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी झालेली असली तरी दोन शिक्षकी शाळांसंदर्भात शासनाचा नियम आहे. समायोजनाबाबत आदेश आले तर, शिक्षकाचे समायोजन केले जाईल.

-अशोक पाटील, गटशिक्षणाधिकारी.

Web Title: Eight students each at three dormitories in Fulbari taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.