एरंडाच्या बिया खाल्ल्याने आठ विद्यार्थिनींना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:03 AM2018-12-29T00:03:42+5:302018-12-29T00:03:57+5:30
थेरगावातील घटना : पाचोड रुग्णालयात उपचार सुरु
पाचोड : एरंडाच्या बिया खाल्ल्याने थेरगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेतील ८ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी घडली. सर्व विद्यार्थिनींवर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शुक्रवारी दुपारी थेरगावातील शाळेच्या आवारात या मुलींनी एरंडाच्या बिया शेंगदाणे व काजूसारख्या लागतात म्हणून खाल्ल्या. काही वेळानंतर चार वाजेच्या सुमारास शाळा सुटली. याचवेळी शाळेतील विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक विलास गोलांडे यांची भेट घेऊन शाळेतील मुलींनी एरंडाच्या बिया खाल्ल्याचे सांगितले. काही वेळातच या मुलींना चक्कर येण्यास सुरुवात झाली. काहींना उलट्या झाल्या. यामुळे पालकांत घबराटीचे वातावरण पसरले. मुख्याध्यापक विलास गोलांडे, शिक्षक प्रदीप मुंगसे, आबासाहेब टकले, शिवाजी वैद्य व शिक्षकांनी तातडीने या बिया खाल्लेल्या विद्यार्थिनींनी तातडीने पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यात अनुजा दिलीप निर्मळ, प्राजक्ता राऊत, श्रृती ताकपीर, आरती ताकपीर, श्रृती भांगड, सुहाना सय्यद आदी मुलींचा समावेश आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित जैन, डॉ. राऊत हे मुलींवर उपचार करीत आहेत. जि.प. सभापती विलास भुमरे, केंद्रप्रमुख बळीराम भुमरे, मुख्याध्यापक विलास गोलांडे यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली.