एकनाथ महाराज यांच्या पादुका मोजक्या वारकऱ्यांसह रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 04:06 PM2020-06-30T16:06:14+5:302020-06-30T16:06:50+5:30
वारकऱ्यांना यंदा माऊलीचे दर्शन घडणार नसल्याने पादुका प्रस्थान समयी वारकरी हवालदिल झाल्याचे दिसून आले.
- संजय जाधव
पैठण: आषाढी वारीसाठी संत श्री एकनाथ महाराज यांच्या पादुका परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने आज नाथमंदिरातून मोजक्या वारकऱ्यासह रवाना करण्यात आल्या. शासनाने पायीवारी रद्द केल्याने औपचारिक प्रस्थान झाल्यानंतर गेल्या १८ दिवसापासून नाथांच्या पादुका गावातील नाथमंदीरात मुक्कामी होत्या. दरम्यान विठ्ठल दर्शनाची आस असणाऱ्या वारकऱ्यांना यंदा माऊलीचे दर्शन घडणार नसल्याने पादुका प्रस्थान समयी वारकरी हवालदिल झाल्याचे दिसून आले.
४२२ वर्षाची पायीवारीची प्रथा असलेल्या नाथांचा पायी पालखी सोहळा रद्द झाल्याने आषाढी एकादशीच्या दर्शनासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे आज २० वारकऱ्यासह पादुका नाथमंदिरातून वाजत गाजत भानुदास एकनाथ अशा गजरात रवाना करण्यात आल्या. रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे व पालखी प्रमुख हभप रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्या हस्ते नाथमंदीरात पादुका आरती करण्यात आली.
या वेळी संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, रेखाताई कुलकर्णी, व वारकरी उपस्थित होते. आरती झाल्यानंतर मंत्री भुमरे व पालखी प्रमुख रघुनाथ महाराज यांच्या हस्ते पादुका शिवशाही बसमध्ये ठेवण्यात आल्या, यावेळी उपस्थित भाविकांनी भानुदास एकनाथ नामाचा गजर करून बसवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
ज्या शिवशाही बसने नाथ महाराजांच्या पादुका पंढरपूरला जाणार होत्या. त्या बसला पारंपरिक पालखीस जसे सजवतात तसे फुला पानाने सजविण्यात आले होते. बस पादुका घेउन निघाल्यानंतर रस्त्याने भाविक नागरिक पालखीचे जसे दर्शन घेत होते तसेच अंतकरणातून बसचे हात जोडून दर्शन घेताना दिसून आले.
रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी नाथाच्या पादुका असलेल्या बसने पैठण तालुक्याच्या सीमेपर्येंत प्रवास केला. तालुक्याच्या सीमेवर मंत्री भुमरे व तहसीलदार शेळके यांनी बसला निरोप दिला.पादुका असलेल्या बस सोबत तहसीलदार एस एन लाड केअर टेकर ऑफिसर म्हणून रवाना झाले. बस सोबत सुरक्षेसाठी पोलीस व्हँन रवाना झाली.पोलीस व्हँन बस सोबत पैठण ते पंढरपूर व पंढरपूर ते पैठण अशी राहणार आहे.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग...’’
पांडुरंगानेच सांगितले ' विसरू नका मज ' आणि देवच जर आमची वारी चुकवतो तर आम्ही काय करायचे अशा उद्विग्न प्रतिक्रिया नियमितपणे पायी वारीस जाणाऱ्या वारकऱ्यातू आज उमटल्या. नाथांच्या पालखीसोबत अनेक वर्षांपासून पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची वारी चुकल्याने पालखी प्रस्थान समयी त्यांना भरून आले होते. विठ्ठलाच्या भेटीच्या आशेने आषाढीवारीची प्रतिक्षा वारकरी संप्रदायास असते.
उन वारा पाऊस याची तमा न बाळगता, कुठल्याही सोयी सुविधाची अपेक्षा न करता वारकरी विठ्ठल नामाच्या प्रवाहात पंढरपूरकडे पायी प्रवास करत असतो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायीवारी रद्द झाल्याने हजारो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनास मुकणार असल्याने वारकरी अस्वस्थ झाले आहेत. नाथांच्या पादुका पंढरपूरला रवाना झाल्या तेव्हा वारकऱ्यांची तगमग व घालमेल स्पष्ट दिसून येत होती. आमचे पंढरपूरला येणे होणार नसल्याने बा विठ्ठला आता तुम्हीच आम्हाला भेटायला या अशी भावना वारकरी व्यक्त करत होते.