मुख्यमंत्र्यांच्या 'लाडूतुलेत' गोंधळ, स्थानिकांनी अवघ्या 21 सेकंदात पळवली 100 किलो मिठाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 04:43 PM2022-09-12T16:43:12+5:302022-09-12T17:01:47+5:30
एकनाथ शिंदेंच्या औरंगाबाद दौऱ्यात त्यांची मिठाईने तुला आयोजित केली होती.
औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath SHinde) आज(सोमवार) औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांची कॅबिनेट मंत्री संदिपान भूमरे यांच्या पैठण गावात भव्य सभा होणार आहे. या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. तत्पुर्पी मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात स्थानिकांनी मिठाई पळवल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांची पैठणला मोठी सभा होणार आहे. त्यांच्या सभेसाठी जय्यत तयारी झाली असून, अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे पैठणकडे जात असताना बिडकीन गावात शिंदे समर्थकांनी त्यांची लाडू-पेढ्यांनी तुला करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात वेगळाच गोंधळ पाहायला मिळाला.
पेढेतुला करण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार, स्थानिकांनी पळवली 100 किलो मिठाई...#EknathShindepic.twitter.com/zt7X6Y8AuI
— Lokmat (@lokmat) September 12, 2022
बिडकीनमधील शिंदे समर्थकांनी एकनाथ शिंदेंची लाडू आणि पेढ्यांनी तुला करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. पण, शिंदेंना नियोजित वेळेत पोहोचला न आल्याने त्यांनी तुला करण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी पाठ फिरवताच तिथे उपस्थित कार्यकर्ते आणि इतर स्थानिक नागरीक मिठाईवर तुटून पडले. यावेळी इतका गोंधळ झाला की, अवघ्या 21 सेकंदात लोकांनी तब्बल 100 किलोहून अधिक मिठाई ध्वस्त केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सभेपूर्वी ऑडिओ क्लिप व्हायरल...
मुख्यमंत्र्यांच्यौ दौऱ्यापूर्वी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यकर्त्यांची एक Audio Clip Viral झाली आहे. या Audio Clip मध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच अडीचशे ते 300 रुपये देऊन महिलांना सभेसाठी आणण्यात आले, असे देखील संभाषण क्लीपमध्ये आहे. ही ऑडिओ क्लीप कधीची आहे? आताची आहे की जुनी आहे? याबाबत खात्रीशीर माहिती नाही. मात्र, शिंदे गटाकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. याप्रकरणी शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे