Eknath Shinde: "कसं काय पाटील बरं हाय का, दिल्लीत जे घडलं ते खरं हाय का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 01:34 PM2022-09-13T13:34:54+5:302022-09-13T13:36:06+5:30
या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. त्यानंतर, जयंत पाटील यांच्यावरही पलटवार केला.
औरंगाबाद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी औरंगाबाद दौऱ्यातील सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह ठाकरे गटातील शिवसेना नेत्यांवरही त्यांनी तोफ डागली. मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांची सभा झाली. प्रामुख्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणा दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला. आधी अजित पवार टीका करायचे आता सुप्रिया सुळेही करत आहेत, असे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर प्रहार केला. तसेच, जयंत पाटील यांनाही, कसं काय पाटील बरं हाय का... असे म्हणत टोमणाही मारला.
ताई म्हणाल्या, अजितदादा सकाळी सहा वाजेपासून काम सुरु करतात. पण ताई, मी सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतो. कोणी निंदा, कोणी वंदा विरोधकांचा टीका करणेच धंदा आहे. पण या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. त्यानंतर, जयंत पाटील यांच्यावरही पलटवार केला.
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन टिका केली होती. दिल्लीत सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला गेल्यामुळे पाटील यांनी टिका केली होती. त्यावर बोलताना, एक मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर विराजमान होत आहे, त्यांचं अभिनंदन करायला आम्ही गेलो होते. विशेष म्हणजे या सोहळ्याचं आम्हाला आमंत्रणही होते. विरोधी पक्षनेत्यांनाही आमंत्रण होतं, असेही शिंदे यांनी म्हटले. त्यानंतर, पाटील यांच्यावर टीकाही केली.
राष्ट्रवादीतील नाराजी नाट्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी निशाणा साधला. काल दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात जयंत पाटील यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना बोलू दिले नाही. जयंत पाटील यांना विरोधी पक्ष नेता व्हायचे होते, पण इथे अजित पवारांची दादागिरी चालली. तर दिल्लीत जयंत पाटील यांनी दादांचे चालू दिले नाही, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. यावेळी, एक जूनं फेमस गाणं आहे, कसं काय पाटील बरं हाय का, दिल्लीत जे घडलं ते खरं हाय का, असे म्हणत खोचक टोलाही शिंदेंनी लगावला.