शिंदेंनी बंडातील साथीदार आमदारांना पुन्हा दिली उमेदवारी; पैठणमधून खासदार पुत्र मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 01:36 PM2024-10-23T13:36:39+5:302024-10-23T13:40:39+5:30
छत्रपती संभाजीनगरजिल्ह्यातील विद्यमान चारही आमदारांना पुन्हा उमेदवारी, कन्नडबाबत पेच कायम
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेने (शिंदे गट) विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी रात्री ११:३० वाजता उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यमान चार आमदारांसह व खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांचा समावेश आहे. यासोबतच मराठवाड्यातील अन्य पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
महायुतीतील भाजपने पहिली यादी घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेची पहिली यादी मंगळवारी घोषित करतील, असे त्यांचे प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी सांगितले होते. त्यानुसार रात्री उशिरा शिवसेनेने पहिली यादी एक्स या समाजमाध्यमावर प्रसिद्ध केली. शिवसेनेच्या पहिल्या यादीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मंत्री अब्दुल सत्तार यांना सिल्लोडमधून तर शिवसेना प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांना औरंगाबाद पश्चिममधून (अनुसूचित जाती प्रवर्ग राखीव), औरंगाबाद मध्य मतदार संघातून आ. प्रदीप जैस्वाल व वैजापूरमधून आ. रमेश बोरनारे यांना पुन्हा संधी देण्यात आली. खासदार संदीपान भुमरे यांच्या इच्छेनुसार त्यांचे पुत्र विलास भुमरे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे.
कन्नडचा पेच कायम
कन्नड विधानसभा मतदार संघातून शिंदेसेनेकडून केतन काजे आणि भरत राजपूत इच्छुक आहेत. भाजपच्या संजना जाधव यादेखील तयारी करीत आहे. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष कन्नडवर दावा करीत आहेत. कन्नडची उमेदवारी जाहीर न झाल्याने कन्नड मतदारसंघाचा पेच कायम असल्याचे स्पष्ट झाले. भाजपाने दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील तीन औरंगाबाद पूर्व, गंगापूर व फुलंब्री मतदार संघातून उमेदवारांची घोषणा केलेली आहे. जिल्ह्यातील ९ मतदारसंघापैकी भाजप व शिंदे सेनेने मिळून ८ मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. आता फक्त कन्नड कुणाच्या वाट्याला जातो याकडे लक्ष लागून आहे.
जालन्यातून खोतकर यांना उमेदवारी
मराठवाड्यातील नांदेड उत्तरमधून बालाजी देवीदास कल्याणकर, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीतून संतोष लक्ष्मण बांगर, जालना मतदारसंघातून माजी मंत्री अर्जुन पंडितराव खोतकर, उमरगा (धाराशिव) येथून विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले तर परंडा मतदारसंघातून विद्यमान मंत्री डॉ. तानाजी सावंत यांना शिवसेनेने निवडणूक रिंगणात उतरविले आहे.