Eknath Shinde: नाराज संजय शिरसाट घरवापसी करणार? आधी ट्विट, आता स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 08:38 AM2022-08-13T08:38:09+5:302022-08-13T10:33:56+5:30
शिरसाट यांनी टि्वट सोबतचं विधानसभेतलं उद्धव ठाकरेंचं एक भाषण देखील जोडलं होतं
औरंगाबाद/मुंबई - सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जय महाराष्ट्र केला आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटाचा झेंडा खांद्यावर घेतला. मात्र सुरुवातीपासून शिंदे गटात सामील होऊनही शिरसाट यांना मंत्रिपद मिळालं नाही. अशातच काल रात्री शिरसाट यांनी एक ट्वीट( Sanjay Shirsat Tweet) केलं. ज्यात 'उद्धव ठाकरे' यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. या ट्विटची वादळी चर्चा सुरु होताच शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीशी फोनवरुन संपर्क साधत ट्विटचा खुलासा केला आहे.
शिरसाट यांनी टि्वट सोबतचं विधानसभेतलं उद्धव ठाकरेंचं एक भाषण देखील जोडलं होतं. पण, काही वेळातचं त्यांनी हे ट्वीट डिलीट देखील केलं आहे. तसेच, आपण नाराज नसून शिंदे गटात आम्ही सर्वजण खूप खुश आहोत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण ट्वीट करत शिंदे गटाला इशारा तर दिला नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
म्हणून तसं ट्विट केलं
मी जे ट्विट केलं होतं, ते उद्धव ठाकरेंनी विधानसभेत भाषण केलं होतं. त्या भाषणात त्यांनी महाराष्ट्राबद्दलचं आपलं मत व्यक्त केलं होतं. ते व्यक्त करताना कुटुंब प्रमुखाची भूमिका ते बजावत होते. त्यामुळे, आजही माझं मत आहे की, तुम्ही कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावत असाल तर कुठेतरी कुटुंबातील व्यक्तींच मत लक्षात घ्यायला हवं. तुमचं मत काय आहे, यापेक्षा तुमच्या कुटुंबाचं मत काय आहे याला मान दिला पाहिजे, हा त्या मागचा अर्थ होता, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. तसेच, आपण एकनाथ शिंदेंसोबतच असून कुठलीही नाराजी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मी नाराज नाही, आजही भूमिका कायम
आम्ही उद्धव ठाकरेंना कुटुंबप्रमुखच मानत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे, आजची जी परिस्थिती आहे, त्याचा आम्हालाही खेद वाटतो. नाही, मंत्रीपद मिळालं नसल्याने मी हे ट्विट केलं नाही. मी तत्वाने वागणारा माणूस आहे. आजपर्यंतच्या शिंदेगटासोबतच्या प्रवासात मी कायमच स्पष्टपणे बोलणारा राहिलो आहे. मला जे योग्य वाटतं, ते बोलतो. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊ नये हीच माझी भूमिका होती आणि आजही त्यावर मी कायम आहे. आम्ही सर्वजण खूश आहोत, अशा शब्दात शिरसाट यांनी आपली भूमिका टीव्ही 9 शी बोलताना स्पष्ट केली आहे.