"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 03:13 PM2024-10-01T15:13:13+5:302024-10-01T15:15:37+5:30
आनंद दिघे यांच्या जीवनावरील मराठी चित्रपट आला आहे, या सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे.
आनंद दिघे यांच्या जीवनावरील मराठी चित्रपट आला आहे, या सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे. दोन दिवसापूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आनंद दिघे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. 'धर्मवीर आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता. हे ठाणे जिल्ह्याला माहीत आहे, असा गंभीर आरोप शिरसाट यांनी केला होता. यावर आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
माध्यमांसोबत बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, संजय शिरसाट यांनी केलेले विधान चुकीचे आहे, त्यांना काही काम धंदे नाहीत का? ते नेहमी ठाकरे परिवारावर बोलतात. त्यांना आतापर्यंत कोणी मोठं केले, तरीही ते असं बोलतात. आता शिरसाट यांचा पराभव केला पाहिजे, त्यांचा पराभव करणारा मीच आहे. दिघेंच्या शेवटच्या क्षणी जर शिरसाट तिथे असतील तर आम्हाला शंका येते की संजय शिरसाट यांनी हे कृत्य केले असेल, असा गौप्सस्फोटही चंद्रकांत खैरे यांनी केला.
"आजचे मुख्यमंत्री हे शेवटच्या क्षणी आनंद दिघेंच्याजवळ होते. त्यांनी तसं चित्रपटातही दाखवले आहे. आता आम्हाला माहित नाही कुणी, काय केलं. तुम्ही त्यांनाही विचारलं पाहिते. आनंद दिघे यांची प्रतिमा चांगली आहे ती बदनाम करण्याच काम संजय शिरसाट करत आहेत, असा आरोपही खैरे यांनी केला.
संजय शिरसाठ यांचा आरोप काय?
धर्मवीर आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता. हे ठाणे जिल्ह्याला माहीत आहे, असा गंभीर आरोप शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये दिघे उपचार घेत होते ते हॉस्पिटल कायम बंद का करण्यात आले, असा सवाल करत शिरसाट यांनी दिघेचा यांचा मृत्यू का झाला याची चौकशी करण्याची मागणी केली.
संजय शिरसाठ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिघे यांच्या मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यात प्रत्येक जण दिघे यांचा घातपात झाल्याचा आरोप करतात. दिघे यांना डिस्चार्ज दिला जाणार होता. मात्र डिस्चार्ज द्यायच्या आधीच त्यांचा मृत्यू कसा झाला असा सवाल शिरसाठ यांनी केला आहे.