झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
By संतोष हिरेमठ | Published: September 29, 2024 03:52 PM2024-09-29T15:52:12+5:302024-09-29T15:52:38+5:30
'एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे, असे पोलिसांनीच सांगितले होते. तरी त्या फाईलवर सही का केली नाही. काय कारण होते?'
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (शिंदेसेनेचे) प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 'एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून धमक्या देण्यात आल्या. कोण देत होते धमक्या? त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे, असे पोलिसांनी स्वत: सांगितले होते. तरी त्या फाईलवर सही का केली नाही. काय कारण होते? काय फरक पडला असता? तुम्हाला त्यांना शहीद करायचे होते. झेड प्लस सुरक्षा नाकारणे, याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना शहीद करण्याच्या मार्गावर नेऊन उभे करणे, असा होतो. परंतु ते एकनाथ शिंदे होते. सर्व डावपेचाला ओळखून होते', असे शिरसाट म्हणाले.
आ. शिरसाट यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दिघे पॅटर्न एकनाथ शिंदे यांच्यासोबत वापरला जाणार होता, अशी चर्चा मध्यंतरी होती. यात काय तथ्थ आहे, अशी विचारणा पत्रकारांनी केली असताना आ. शिरसाट म्हणाले की, 'आनंद दिघेंच्या मृत्यूसंदर्भात मी काल जे वक्तव्य केले, त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडले. आनंद दिघे यांचा डिस्चार्ज होणार असताना, अचानक त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू कसा होतो? असे मी बोललो. काही लोकांनी त्याचा वेगळा अर्थ घेऊन कुठेतरी लिंक जोडण्याचा प्रयत्न केला.'
'दिघेंवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आतोनात प्रेम होते. मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख आणि दिघे यांचा संवाद आम्ही पाहिलेला आहे. दिघेंचे वर्चस्व वाढतेय, ते किंग होताय, दिघेंच्या हातात शिवसेनाप्रमुखांनी सर्व काही दिले आहे. मग त्यांना छाटण्याचे प्रयत्न त्यावेळपासून सुरु झाले होते. दिघेंना धुळे येथील संपर्क प्रमुख करण्याचा प्रयत्न झाला. परंतु दिघेंनी त्यास नकार दिला. एखादा माणूस संघटनेत जेव्हा मास लिडर व्हायला जातो, त्या वेळी कटकारस्थान ज्या लोकांनी केला, त्यांच्यावर माझा आक्षेप आहे', असेही आ. शिरसाट म्हणाले.