'एकनाथ शिंदे काँग्रेस तर रामदास कदम राष्ट्रवादीत जाणार होते, पण...', चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 06:17 PM2022-09-21T18:17:30+5:302022-09-21T18:44:24+5:30

'उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मंत्री केले, आता हेच शिवसेना फोडायला निघाले आहेत.'

'Eknath Shinde was going to Congress and Ramdas Kadam was going to NCP', says Chandrakant Khair | 'एकनाथ शिंदे काँग्रेस तर रामदास कदम राष्ट्रवादीत जाणार होते, पण...', चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

'एकनाथ शिंदे काँग्रेस तर रामदास कदम राष्ट्रवादीत जाणार होते, पण...', चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

googlenewsNext

औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी केलेले शिवसेना नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटंबावर केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. यातच आता शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रामदास कदमांवर टीका आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

'उद्धव ठाकरेंना त्रास देण्याचे काम सुरू'
लोकमतशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, 'शिंदेगटाचे पदाधिकारी निवडणूक आयोगाकडे जात आहेत. पण, त्यांच्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आम्ही शिवसेनेकतून हाकलून दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचे काम रामदास कदम आणि एकनाथ शिंदे करत आहेत. जितका तुम्ही त्रास द्याल, तितकी शिवसेना पेटून उठेल आणि शिवसेनेला सहानुभुती मिळत राहील.' 

'शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते'
खैरे पुढे म्हणाले, 'आज शिवसेना फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात पसरलेली आहे. उद्धव ठाकरेंनी देशभर पक्षाचे नेटवर्क तयार केले आहे. बाळासाहेबांची शिवसेना सुरुवातीपासूनची आहे. उद्धव ठाकरेंनी शिंदेंना युती काळात मंत्री केले, आधी ते उद्धवजींचा आदेश मानायचे. पण, आता अचानक काय झालंय की, शिवसेनाच फोडायला निघाले आहेत. मूळात हे एकनाथ शिंदेच काँग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हा शिंदे त्यांच्याकडे गेले. पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना अहमद पटेलांना भेटण्यास सांगितले. शिंदेंनी प्रयत्न केला, पण पुढे काही झालं नाही. रामदास कदम हेदेखील राष्ट्रवादीत जाणार होते, पण बाळासाहेबांनी त्यांना रोखले. आता हेच दोघे मांडीला मांडी लावून बसले आहेत,' असा मोठा खुलासा त्यांनी यावेळी केला.

'रामदास कदमांनी भ्रष्टाचार केला'
खैरे पुढे म्हणाले की, 'रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंबद्दल असं बोलत असेल, तर आम्ही शांत बसणार नाहीत. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं, त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलता. रामदास कदम आणखी काही बोलले, तर लोक प्रत्यक्षात त्यांना जोडे मारतील. मंत्री असतान त्यांनी खूप भ्रष्टाचार केला, अनेकांकडून त्यांनी पैसे खाल्ले. मी त्यावेळेस तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली होती,' अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. 

'दसरा मेळावा शिवसेनेची परंपरा'
यावेळी खैरेंनी दसरा मेळाव्यावरुन सुरू असलेल्या वादावरही भाष्य केले. 'शिवतीर्थावर बाळासाहेबांनी 1966 पासून सर्व मेळावे घेतले आहेत. ही शिवसेनेची परंपरा आहे, ती बदलू शकत नाही. दबाव टाकून त्रास द्यायचे काम करणार असाल, तर शिवसैनिक संतापून उठेल,' असं खैरे म्हणाले. तसेच, 'मला आणि अंबादास दानवेंना गोमूत्राने धुतले पाहिजे, असे संदिपान भूमरे म्हणाले होते. चांगलंय ना मग, गोमूत्र पवित्र असत. पण, तुम्ही जी सात दारुची दुकाने उघडली आहेत, आता त्याच दारुने स्वतःला धुवा. यासाठी कुठून पैसा आला, त्याचे उत्तर द्या आधी. मंत्री असताना यांनी 30-30 कमिशन खाल्ले, तो अतिशय विचित्र माणूस आहे,' अशी टीका त्यांनी यावेळी मंत्री संदिपान भूमरे यांच्यावर केली. 

Web Title: 'Eknath Shinde was going to Congress and Ramdas Kadam was going to NCP', says Chandrakant Khair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.