'शिंदेंचं वागणं म्हणजे, मुंह मे राम, बगल मे छुरी'; ठाकरे गटाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 10:01 PM2023-04-09T22:01:20+5:302023-04-09T22:05:09+5:30
ठाकरे गटासह भाजपचेही अनेक कार्यकर्ते 2 दिवसांपासून अयोध्येत उपस्थित आहेत.
छत्रपती संभाजीनगर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज रामललाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची विचारधारा एकच असल्याचेही सांगितले. आता, ठाकरे गटाकडूनही शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात येतंय. ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन त्यांच्यावर टीका केलीय.
ठाकरे गटासह भाजपचेही अनेक कार्यकर्ते 2 दिवसांपासून अयोध्येत उपस्थित आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचे आभार मानले. राममंदिर ही आपली श्रद्धा आहे. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाळासाहेब ठाकरे आणि करोडो भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पण, काही लोकांना हिंदुत्त्वाची एलर्जी आहे, म्हणूनच त्यांनी वडिलांना दिलेलं वचन मोडलं, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. आता, मुख्यमंत्री शिंदेंवर ठाकरे गटाच्या चंद्रकां खैरेंनी पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पाठीत एकनाथ शिंदे यांनी खंजीर खुपसला. त्यामुळे, एकनाथ शिंदेंचं वागणं म्हणजे "मूह मे राम, बगल मे छुरी", असंच आहे. मी अनेक वेळेला आयोध्याला गेलो, मी कार सेवा केली. पण, शिंदे यांचे असं चाललंय जसं की, हेच राम भक्त आहेत, हेच धनुष्यबाण वाले आहेत, आम्ही कोणीच नाहीत. श्रीराम एक वचनी होते, परंतु एकनाथ शिंदे हे अनेक वचनी आहेत. जे उद्धव ठाकरे यांचे झाले नाही ते श्रीरामाचे काय होणार ''मुह मे राम बगल मे छुरी'', असं एकनाथ शिदेंचं वर्तन असल्याची घणाघाती टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. तर, उद्धव ठाकरे यांनी अगोदर राम मंदिर नंतर सरकार अशी घोषणा केली होती, याची आठवणही खैरेंनी करुन दिली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे
अयोध्येत बोलताना शिंदे म्हणाले की, अयोध्येचा विकास वेगाने होत आहे. हजारो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटणार आहे. काँग्रेसवर ताशेरे ओढत ते म्हणाले की, काही लोक आहेत, ज्यांना वेदनाही होत आहेत. त्यांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. स्वातंत्र्यानंतर काही लोक हिंदुत्वाबद्दल गैरसमज पसरवत होते, ते आजही करत आहेत. आमचे हिंदुत्व सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. हिंदुत्वामुळे राजकीय दुकाने बंद होतील, असे अनेकांना वाटते. मंदिर बांधणार पण तारीख सांगणार नाही, असे बोलणाऱ्या लोकांना पीएम मोदींनी मंदिर बांधून उत्तर दिले, अशी टीका त्यांनी यावेळी केली.