एकजुटीनं पेटलं रानं, तुफान आलंया...!

By Admin | Published: February 21, 2017 10:53 PM2017-02-21T22:53:17+5:302017-02-21T22:59:00+5:30

उस्मानाबाद : दुष्काळग्रस्त शिक्का पुसण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावा-गावात चुरस निर्माण झाली आहे़

Ekusutanaya bhayaananaya, a storm hit ...! | एकजुटीनं पेटलं रानं, तुफान आलंया...!

एकजुटीनं पेटलं रानं, तुफान आलंया...!

googlenewsNext

उस्मानाबाद : दुष्काळग्रस्त शिक्का पुसण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावा-गावात चुरस निर्माण झाली आहे़ लोकसहभागातून पाणलोटाची कामे करण्यासाठी ग्रामस्थांनीही पुढाकार घेतल्याचे चित्र परंड्यासह कळंब आणि भूम तालुक्यात दिसून येत आहे़ या स्पर्धेत या तीन तालुक्यातील २४२ गावांचा समावेश आहे़
‘सत्यमेव जयते’ या मालिकेच्या माध्यमातून सत्यजीत भटकळ या निर्मात्याने सद्यस्थितीतील समाजासमोर असलेले अनेक प्रश्नांची मांडणी केली़ विशेष म्हणजे अमिर खान या मालिकेचा केंद्रबिंदू होता़ त्याच्या लोकप्रियतेमुळे या मालिकेबरोबरच या मालिकेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावरही गांभिर्याने चर्चा सुरू झाली़ लोकांचा प्रतिसाद पाहून भटकळ यांच्याबरोबरच अमिर खान यांनीही हा विषय पुढे घेऊन जाण्याचे निश्चित केले़ त्यातूनच पाणी फाऊंडेशनची स्थापना झाली़ अमिर खान सोबत त्यांची पत्नी किरण रॉय ही या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून, या संस्थेने मागील वर्षी अमरावती, सातारा आणि बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणलोटाचे काम हाती घेतले़ बीडमध्ये अंबाजोगाई, साताऱ्यात कोरेगाव तर अमरावतीतील वरूड तालुक्यात श्रमदानातून पाणलोट विकास, माथा ते पायथा अशी कामे करण्यात आली़ तब्बल ११६ गावात पाणलोटाची कामे करून घेण्यात या फाऊंडेशनला यश आले़
यावर्षी या फाऊंडेशनने मराठवाड्यातील दहा तालुक्यांसह राज्यातील तीस तालुक्यात याच पध्दतीने कामे करण्याचा संकल्प केला़ यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील दहा, विदर्भातील दहा तर मराठवाड्यातील दहा अशी राज्यातील तीस तालुक्यातील २०२४ गावे निवडली असून, तेथे पाण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे़ याबरोबरच ग्रामसभेतही ग्रामस्थांना या उपक्रमाबाबत माहिती देऊन वॉटर कॅप स्पर्धेत सहभागी होण्याचे ठराव घेण्यात आले आहेत़
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ९६ पैकी ६३, कळंब तालुक्यातील ९४ पैकी ९४, भूम तालुक्यातील ९४ पैकी ८५ गावांनी या वॉटर कॅप स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे़ तीन तालुक्यातील एकूण २४२ गावांचा समावेश आहे़ उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक गावात पाच जणांची टीम तयार करण्यात आली आहे़ या टीमला अंबाजोगाई येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ आजवर परंडा व भूम तालुक्यातील प्रत्येकी एक टीम प्रशिक्षणासाठी गेली आहे़ तर कळंब तालुक्यातील दोन टीम प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आल्या आहेत़
पाच जणांमध्ये एक वॉटस्अ‍ॅप वापरणारा निवडण्यात आला असून, त्याच्या माध्यमातून सोशल मीडियावरही जनजागृती केली जाणार आहे़ प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या पाच जणांनी गावातील नागरिकांना प्रशिक्षित करावयाचे आहे़ वॉटर कॅप स्पर्धा ही ८ एप्रिल ते २२ मे या या ४५ दिवसांच्या कालावधीत होणार आहे़ यात जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या गावाला ५० लाख, द्वितीय येणाऱ्या गावाला २० लाख तर तृतीय येणाऱ्या गावाला २० लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे़ त्याशिवाय तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाच्या गावाला १० लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे़
विजेत्यांना १५ आॅगस्ट रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात पारितोषिकांचे वाटप करण्यात येणार आहे़ एकूणच या गावातील नागरिकांचा सहभाग आणि श्रमदानातून होणाऱ्या या कामांमुळे गावा-गावातील पाणीटंचाईवर कायम मात करण्यात यश येणार असून, या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी गावा-गावातील ग्रामस्थ कामाला लागले आहेत़(प्रतिनिधी)

Web Title: Ekusutanaya bhayaananaya, a storm hit ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.