वृद्ध दाम्पत्याची आजाराला कंटाळून आत्महत्या

By | Published: December 6, 2020 04:00 AM2020-12-06T04:00:08+5:302020-12-06T04:00:08+5:30

पैठण : आजाराला कंटाळून पैठण शहरातील वृद्ध दाम्पत्याने जायकवाडी धरणाच्या जलाशयात आत्महत्या केली. शनिवारी पहाटे जलाशयात दोघांचे शव तरंगत ...

Elderly couple commit suicide due to illness | वृद्ध दाम्पत्याची आजाराला कंटाळून आत्महत्या

वृद्ध दाम्पत्याची आजाराला कंटाळून आत्महत्या

googlenewsNext

पैठण : आजाराला कंटाळून पैठण शहरातील वृद्ध दाम्पत्याने जायकवाडी धरणाच्या जलाशयात आत्महत्या केली. शनिवारी पहाटे जलाशयात दोघांचे शव तरंगत असताना आढळून आले होते. सूर्यभान दयाराम राऊत (७२) व कौशल्या सूर्यभान राऊत (६६) आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव असून ते शहरातील रेणुकादेवी गल्लीतील रहिवासी आहेत. आत्महत्येपूर्वी पाण्याबाहेर ठेवलेल्या बुटात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिलेले आहे. सूर्यभान राऊत गुडघे दुखीने तर कौशल्या राऊत किरकोळ आजाराने त्रस्त असल्याचे पुढे येत आहे.

जायकवाडी धरणाच्या जलाशयात धरण नियंत्रण कक्षापासून काही अंतरावर शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक पुरुष व महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या पाहणीनंतर ते पती-पत्नी असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत होते. याची माहिती कक्षातील तांत्रिक सहाय्यक गणेश खराडकर यांनी पैठण पोलिसांना दिली. यानंतर पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह फौजदार रामकृष्ण सागडे, सुधीर ओव्हळ, मनोज वैद्य, राजू शेख, राजू आटोळे, चव्हाण, नाईक, सविता सोनार आदींनी जलाशयातून मृतदेह बाहेर काढून ते पैठणच्या शासकीय रूग्णालयात हलवले.

शुक्रवारी दुपारचे जेवण करून थोडे बाहेर जाऊन येतो असे सांगून ते घराबाहेर पडले होते. दरम्यान रात्र झाली तरी आई-वडील घरी परत न आल्याने त्यांची मुले नातेवाईक पाहुणे आदीकडे गेले असावेत असे समजून त्यांची चौकशी करत होते. परंतु, सकाळी आई वडिलांनी धरणात आत्महत्या केल्याचे समजताच राऊत कुटुंबाला हादरा बसला. जायकवाडी धरणाच्या जलाशयात शनिवारी शहरातील वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. दिवाळीच्या पाडव्याला बिबट्याने आपेगाव येथे हल्ला करून पितापुत्रास ठार केल्यापासून तालुक्यात सातत्याने दुर्घटना घडून बळी जात असल्याने पैठण तालुका हादरला आहे. नवनवीन तंत्रज्ञान व उपचाराच्या युगात गुडघेदुखी सारख्या आजारासमोर हे वृद्ध दाम्पत्य शरण गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वृद्धांच्या समस्या व भावना समजून घेण्यासाठी समाजरचनेत आज कुठलीही व्यवस्था नसल्याने एका विशिष्ट वयानंतर एकटेपणाची भावना अस्तित्वाला टोचत असल्याने अशा घटना अलीकडे समोर येत असल्याची चर्चा आहे.

--------- मुले मोठ्या हुद्यावर ----------------

घटनास्थळी दगडी पिचिंगवर या दाम्पत्याचे बुट, चप्पल, पाण्याची बाटली व खाद्यपदार्थ आदी साहित्य आढळून आले. बुटात सापडलेल्या चिठ्ठीत आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याने लिहले होते. रेणुकादेवी गल्लीत राहणारे सूर्यभान व कौशल्या राऊत या दाम्पत्यास चार मुले असून एक मुलगा अमेरिकेत तर एक पुण्यातील कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहेत. दोन मुले शहरात असून एका मुलाचे पैठण शहरातील शिवाजी महाराज चौकात चप्पल बुटाचे दुकान तर दुसऱ्याचे कोर्ट रोडवर गँरेज आहे. सूर्यभान राऊत यांना गेल्या काही वर्षांपासून गुडघे दुखीने जखडले होते. तर कौशल्या राऊत सारख्या आजारी राहत असल्याने दोघेही आजाराने कंटाळले होते. या दोघावर वैद्यकीय उपचार सुरू होते.

---- फोटो

Web Title: Elderly couple commit suicide due to illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.