१०० दिवस उलटूनही वृद्धांना मिळेना दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:05 AM2021-07-23T04:05:07+5:302021-07-23T04:05:07+5:30
औरंगाबाद : पहिल्या डोसला ८४ दिवसांचा कालावधी उलटला तरी दुसरा डोस घेण्यासाठी हजारो नागरिक प्रत्येक लसीकरण केंद्रावर ...
औरंगाबाद : पहिल्या डोसला ८४ दिवसांचा कालावधी उलटला तरी दुसरा डोस घेण्यासाठी हजारो नागरिक प्रत्येक लसीकरण केंद्रावर रांगा लावून टोकन घेण्यासाठी प्रयत्न करतात. या गर्दीत उभे राहणे ज्येष्ठ नागरिकांना शक्य होत नसल्याने अनेकांच्या पहिल्या डोसला १०० दिवसापेक्षा अधिक कालावधी उलटला तरी ज्येष्ठांना लस मिळत नसल्याचे समोर आले.
काेविडवर मात करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. औरंगाबाद शहरातील नागरिकांना महापालिकेमार्फत विविध लसीकरण केंद्रावर डोस उपलब्ध केले जातात. पहिला डोस घेतलेल्या ८४ दिवसांनी दुसरा डोस उपलब्ध होतो. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोसकरिता कोविन ॲपवर नोंदणी न करता लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध होते, असे महापालिकेतर्फे सांगितल्या जाते. यामुळे लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवसांचा कालावधी पूर्ण केलेले हजारो नागरिक लसीकरण केंद्रावर रोज पहाटे साडेपाच वाजेपासून रांगा लावतात. मुबलक लस उपलब्ध नसल्याने प्रत्येक लसीकरण केंद्राला उपलब्ध होणाऱ्या व्हायलच्या संख्येनुसार रांगेत उभे राहणाऱ्या नागरिकांना कूपन वाटप केल्या जाते. उर्वरित नागरिकांना दुसऱ्या दिवशी येण्याचा सल्ला दिला जातो. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. लसीकरण केंद्रावर ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांग नाही. शिवाय तरुणांच्या बरोबरीने तीन ते चार तास रांगेत उभे राहणे त्यांना शक्य होत नाही. यामुळे अनेक ज्येष्ठांना पहिला डोस घेऊन १०० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला; मात्र लसीकरण केंद्रावरील लांबच लांब रांगा पाहुन ते लस न घेता माघारी जातात.
कोट
पहिला डोस घेऊन मागील महिन्यात २७ जुलै रोजी ८४ दिवसांचा कालावधी संपला. तेव्हापासून आतापर्यंत सिडको एन ३ येथील एमआयटी केंद्रावर आणि पुंडलिकनगर येथील लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी पहायला मिळते. आमच्यासारख्या वयोवृद्धांना रांगेत उभे राहता येत नाही. यामुळे आजपर्यंत आम्हाला लसीचा दुसरा डोस घेता आला नाही.
- छोटूबाई पोटभरे, ज्येष्ठ नागरिक, पुंडलिक नगर.
-------------------------
पहिला डोस ऑफलाइन उपलब्ध करावा
मी पहिला डोस घेण्यासाठी एन ८ येथील आरोग्य केंद्रावर आलो; मात्र येथे पहिला डोस उपलब्ध नाही. शिवाय मला ऑनलाइन नोंदणी करायचे सांगतात. मी ऑनलाइन नोंदणी करू शकत नाही. प्रशासनाने ऑफलाइन पहिला डोस उपलब्ध करून आमचे लसीकरण करावे.
-संदीप जाधव, सिडको.