तरुणाईने मनपाला केले अंतर्मुख!
By Admin | Published: February 17, 2016 11:48 PM2016-02-17T23:48:58+5:302016-02-18T00:06:14+5:30
औरंगाबाद : ‘पाणी वाचवा’ या विषयावर औरंगाबाद महापालिकेतर्फे राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
औरंगाबाद : ‘पाणी वाचवा’ या विषयावर औरंगाबाद महापालिकेतर्फे राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात शिधापित्रिकेशिवाय हंडाभर पाणी मिळणार नाही, या सर्वोत्कृष्ट पोस्टरला पहिले बक्षीस देण्यात आले. चाळीसगावच्या राजश्री देशमुख या विद्यार्थिनीने अनोखे आणि महापालिकेला अंतर्मुख करणारे पोस्टर तयार केले होते.
मनपाच्या पोस्टर स्पर्धेला राज्यभरातील कलावंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेचे बक्षीस वितरण मंगळवारी महापालिकेच्या टाऊन हॉल येथील सभागृहात पार पडले.
यावेळी महापौर त्र्यंबक तुपे, एमआयएम गटनेता नासेर सिद्दीकी, नगरसेवक गंगाधर ढगे, बन्सी जाधव, नगरसेविका शुभा बुरांडे, सुनीला अऊलवार, अर्चना नीळकंठ, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त रवींद्र निकम यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या देशमुखला दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. अमरावतीच्या रेणुका भेरडे हिने द्वितीय बक्षीस पटकावले.
तिला साडेसात हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. श्रीरामपूरच्या सिद्धार्थ डोईफोडेला तृतीय क्रमांकावर समाधान मानवे लागले. त्याला पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. याशिवाय उत्तेजनार्थ अश्विनी सालोडकर, अनंत नवपुते, राजेश मुंधरे, मनोज पाठक, सौरभ टिपरे यांची निवड करण्यात
आली.
परीक्षक म्हणून मनपाचे उपायुक्त निकम, प्रा. बाविस्कर, प्रा. शिरीष आंबेकर, विजया पातूरकर, उदय भोईर, मधुकर गंगावणे आदींनी काम पाहिले. नागरिकांना पाहण्यासाठी टाऊन हॉल येथे हे प्रदर्शन २१ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.