निवडणूक रणधुमाळी सुरु, मराठवाड्यातील २३ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 11:48 AM2021-11-25T11:48:12+5:302021-11-25T11:49:41+5:30
आजपासूनच आचारसंहिता लागू झाली असून २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे
औरंगाबाद : राज्यातील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी केली असून यात मराठवाड्यातील २३ नगरपंचायतींचा समावेश आहे. २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान, तर २२ डिसेंबरला मतमोजणी होणार असून संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू केली आहे.
राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर कोविडसंदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.
मराठवाड्यातील या नगरपंचायतींची निवडणूक...
सोयगाव, बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित), पालम, केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ, वाशी, लोहारा बु., नायगाव, अर्धापूर, माहूर, सेनगाव, औंढा-नागनाथ.
असा असेल कार्यक्रम...
- १ ते ७ डिसेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील.
- ४ व ५ डिसेंबर २०२१ रोजी सुटी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.
- नामनिर्देशन पत्रांची छाननी ८ डिसेंबर २०२१ रोजी होईल.
- मतदान २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असेल.
- २२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.