निवडणूक काळात मोठ्या व्यवहारावर निवडणूक आयोग, आयकरचा डोळा
By प्रशांत तेलवाडकर | Published: March 21, 2024 12:42 PM2024-03-21T12:42:44+5:302024-03-21T12:43:31+5:30
निवडणूक आयोग, आयकर व बँका अलर्ट मोडवर; काळा पैसा पांढरा होऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीच्या काळात काळा पैसा पांढरा होऊ नये यासाठी निवडणूक आयोग, आयकर विभाग ते बँकांच्या ग्रामीण भागातील शाखेपर्यंत सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.
एखाद्या खात्यात अचानक होणाऱ्या मोठ्या व्यवहारावर बँकांची नजर आहेच, शिवाय बँकांना त्यांच्याकडील मोठी रक्कम जर दुसऱ्या शाखेत न्यायची असेल किंवा एटीएममध्ये भरण्यासाठी रक्कम ज्या वाहनातून नेली जाईल, त्यास जीपीएस प्रणाली लावणे व ‘क्यूआर कोड’ तयार करण्याचे आदेश आले आहेत. ‘क्यूआर कोड’ नसेल तर बँकेची रक्कमही जप्त होऊ शकते.
निवडणुकीच्या काळात काळा पैसा मोठ्या प्रमाणात व्यवहारात येत असतो. मागील लोकसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने विविध ठिकाणी केलेल्या वाहन तपासणीत आढळलेला काळा पैसा जप्त करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर बँकेच्या वाहनांचा गैरवापर करीत काळा पैसा त्यातून नेण्यात येत असल्याचे उजेडात आले. यंदा निवडणूक आयोगाने बँकेच्या वाहनांसाठी विशेष नियमावली तयार केली आहे. यामुळे राष्ट्रीयीकृत बँक, खाजगी बँक, नागरी सहकारी बँकांना जिल्हाधिकारी, अग्रणी बँक व्यवस्थापकाकडून निवडणूक आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.
बँकांना वाहनावर लावावी लागेल जीपीएस प्रणाली
निवडणूक काळात बँकेच्या वाहनांचा काळा पैसा नेण्यासाठी गैरवापर होऊ नये. यासाठी निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक तत्त्वे बँकांना पाठविली आहेत. यात एका बँकेतून दुसऱ्या शाखेत किंवा एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी ज्या वाहनांचा वापर होईल त्यास जीपीएस प्रणाली बसविण्यात यावी. याद्वारे वाहनावर संपूर्ण लक्ष ठेवले जाईल.
मोठी रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनावर ‘क्यूआर कोड’
बँकेतून दुसऱ्या बँकेत रोख रक्कम पाठविली जाते. किंवा एटीएमसाठी रोख रक्कम नेली जाते. ही रक्कम कोट्यवधीत असते. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बँकांसाठी सर्व वेबसाइट तयार करण्यात आली आहे. जिथून रोख रक्कम नेण्यात येणार ती रक्कम कोणत्या शाखेत पाठविण्यात येणार, किती रोख, कोण व्यक्ती ते वाहन नेणार, त्या वाहनाचा नंबर अशी संपूर्ण माहिती त्या वेबसाइटवर अपलोड करायची आहे. त्यानंतर त्याचा ‘क्यूआर कोड’ जनरेट होईल. तो ‘क्यूआर कोड’ वाहनांसोबत ठेवायचा आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने वाहनाची तपासणी केली तर त्यातील रक्कम व ‘क्यूआर कोड’ मध्ये देण्यात आलेली रक्कम मॅच होणे आवश्यक आहे. नसता पुढील कारवाईला तयार राहावे लागेल. यासाठी सर्व बँका ‘अलर्ट’ मोडवर काम करीत आहेत.
- रूपेंद्र कोयाळकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, देवगिरी नागरी सहकारी बँक
आयकर विभागाचेही तुमच्या मोठ्या व्यवहारावर लक्ष
बँक खात्यात अचानक होणाऱ्या मोठ्या व्यवहारावर आयकर विभागाचे लक्ष आहे. संशयास्पद व्यवहार असल्यास बँकांना सात दिवसांच्या आत आयकर विभागाला कळविणे आवश्यक आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड जोडणीनंतर आयकर विभागाची ‘एआय’ प्रणालीच आता मोठे व्यवहार शोधून काढत आहे. तसेच, काळा पैसा शोधण्यासाठी आयकर विभागाने राज्यात शीघ्र कृती पथक तयार केल्याचे आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले.
रोख रक्कम नेत असाल तर सावधान
तुम्ही जर बँकेतून किंवा अन्य ठिकाणाहून मोठी रोख रक्कम नेत असला तर सावधान. त्या रोख रकमेसंदर्भातील कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. आयकर विभागाचे शीघ्रकृती पथक, निवडणूक आयोगाचे पथक यांनी रस्त्यात तुमचे वाहन थांबविले व रोख रकमेचे पुरावे तुमच्याकडे नसतील, त्याचा तुम्हाला खुलासा करता आला नाही तर ती रक्कम जप्त होऊ शकते.