मी पाहिलेली निवडणूक....नोकरीची तमा न बाळगता प्रचार केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 07:23 PM2019-04-04T19:23:55+5:302019-04-04T19:30:57+5:30
जेपींच्या विचाराने माझ्यासारखे युवक प्रेरित होऊन आंदोलन, राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवत होते.
देशभरात आणीबाणी लागू केल्यानंतर दडपशाही सुरू होती. त्याविरोधात जयप्रकाश नारायण यांनी देशव्यापी मोहीम उघडली. जेपींच्या विचाराने माझ्यासारखे युवक प्रेरित होऊन आंदोलन, राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवत होते. १९७७ साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या.
जनता पक्षाकडून डॉ. बापूसाहेब काळदाते आणि काँग्रेसकडून अब्दुल अझीम औरंगाबाद लोकसभेसाठी उभे राहिले. जनता पक्षाचे शहराध्यक्ष शालिग्राम बसैये यांनी माझी सिडको-हडको विभागाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. तेव्हा मी वसंतराव नाईक महाविद्यालयात मुख्य लिपिक पदावर नोकरी करत होतो. नोकरीची तमा न बाळगता प्रचारात हिरीरीने सहभाग घेतला. आणीबाणीतील दडपशाही, भ्रष्टाचार याविरोधात बापूसाहेब काळदाते, गोविंदभाई श्रॉफ, मधू लिमये आदींनी रान पेटवले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात लाट निर्माण झाली होती. या लाटेत काळदाते यांना मोठा विजय मिळाला. पुढे १९८४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही एस काँग्रेसकडून साहेबराव पाटील डोणगावकर, आय काँग्रेसकडून अब्दुल अझीम आणि हाजी मस्तान यांनी काढलेल्या दलित मुस्लिम अल्पसंख्याक व सुरक्षा महासंघाने उमेदवार दिला. यात मुस्लिम मताचे विभाजन झाल्यामुळे साहेबराव पाटील डोणगावकर निवडून आले. त्यांना जनता पक्षानेही पाठिंबा दिला होता.
पुढे शहरात शिवसेनेचे वारे वाहू लागले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दौरे सुरू झाले. शिवसैनिक पक्षवाढीसाठी अहोरात्र कष्ट घेत होते. यात प्रामुख्याने माझाही समावेश होता. आक्रमकपणे हिंदूंची बाजू मांडली जात होती. १९८८ साली पहिल्यांदाच महापालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले. मात्र, काँग्रेस, मुस्लिम लीग आणि आरपीआयच्या नगरसेवकांनी मिळून काळे यांना महापौर बनविले. शिवसेना नगरसेवक आक्रमक होते. त्यांची दहशत निर्माण झाली होती. त्यात सर्वात आघाडीवर मीच होतो. एक वर्ष होताच पुन्हा महापौरांच्या निवडणुका लागल्या. त्यात मोरेश्वर सावे हे अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी आरपीआयच्या दोन नगरसेवकांना बरोबर घेत महापौरपद पटकावले. त्या निवडणुकीत आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले.
मोरेश्वर सावे वर्षभर महापौर होते. त्यानंतर महापौरपदाची संधी माझ्याकडे चालून आली होती. मात्र, सावे यांनी त्यासाठी पाच लाख रुपये लागतील, असे सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावे यांचे चांगले संबंध निर्माण झाले होते. म्हणून त्यांच्या शब्दाला किंमत होती. आपल्याकडे पैसे नव्हते. त्यातही विरोध पत्करून, धाडस दाखवून जी शिवसेना उभी केली. त्याच शिवसेनेत पदासाठी पैसे देण्यास ठाम नकार दर्शविला. त्यामुळे माझी संधी हुकली. प्रदीप जैस्वाल यांना महापौर बनविले. १९८९ साली मोरेश्वर सावे यांना शिवसेनेकडून लोकसभेचे तिकीट देण्यात आले. त्यांनी शिवसेना वाढविण्यासाठी काहीही केलेले नव्हते. ‘आयत्या पिठावर भाकरी’ थापण्याचे काम त्यांनी केले.
तेव्हाच सावे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात गुप्त करार झाला होता. लोकसभेला सावे आणि विधानसभेला खैरे असे समीकरण बनले होते. हिंदू मतांच्या आधारावर मोरेश्वर सावे निवडून आले. १९९० साली विधानसभेच्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना तिकीट देण्यात आले तेव्हा त्याचा मी विरोध केला. शिवसेनाप्रमुखांना खरमरीत टीका करणारे एक अनावृत पत्र लिहिले. तेव्हा दोन दिवस खैरेंचा प्रचार थांबला होता. शेवटी मनोहर जोशी यांनी पक्षाच्या मुखपत्रात मला पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे जाहीर केले. तेव्हाच माझा शिवसेनेशी असलेला संबंध संपला.
पुढे महापालिकेत तीन वर्षे अपक्ष म्हणून काम केले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुंबई महापालिकेत चालणारी टक्केवारीची प्रथा सुरू केली होती. मी स्थायी समितीचा सदस्य असतानाही काही चालत नव्हते. तोपर्यंत कोणीही महापालिकेत टक्केवारी घेत नसे. शिवसेनेने टक्केवारी राज सुरू केले. त्या टक्केवारीचा आज भस्मासुर झाल्याचा पाहायला मिळतो. नगरसेवकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा निवडणूक लढवली नाही. तसेच कोणत्या पक्षाचेही काम केले नाही. वसंतराव नाईक महाविद्यालयातील नोकरी केली. त्यातून सेवानिवृत्त झालो.
( शब्दांकन : राम शिनगारे )