मी पाहिलेली निवडणूक...ना जात, ना धर्म केवळ आपला देश अन् समाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 08:39 PM2019-03-30T20:39:03+5:302019-03-30T20:41:10+5:30
प्रचारासाठी कोणाकडेही गाड्या नव्हत्या. पायी चालत जाऊन, ठिकठिकाणी खळीने पोस्टर चिकटवून प्रचार केला जात होता.
औरंगाबादच्या इतिहासात १९६२ साली लोकसभा निवडणुकीत मद्रास विद्यापीठातून भौतिकशास्त्रात सुवर्णपदक पटकावलेले स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ आणि बॅरिस्टर होऊन भारतात परतलेले रफिक झकेरिया यांच्यात लढत होती. दोघेही उच्चविद्याविभूषित होते. सुसंस्कृत, लोकशाही मानणारे आणि जनतेच्या प्रश्नावर झगडणे हाच त्यांचा पिंड होता.
काँग्रेसकडून रफिक झकेरिया यांना उमेदवारी मिळाली, तर संयुक्त महाराष्ट्रवादी गटाकडून गोविंदभाई श्रॉफ लढत होते. गोविंदभार्इंच्या प्रचारात मी सक्रिय होतो. शालेय जीवनापासून हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा, संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा प्रभाव माझ्यावर पडलेला होता. घरातील सर्व जण काँग्रेसचे खंदे समर्थक, माझा सख्खा चुलत भाऊ काँग्रेसचा आमदार. तरीही समाजवादी विचारांमुळे गोविंदभार्इंच्या सान्निध्यात आल्यामुळे त्यांच्या प्रचारात हिरीरीने सहभाग नोंदवला. प्रचारात आपला देश आणि समाज याचा विकास कसा करणार, यावर दोन्ही उमेदवारांचा भर होता. प्रचारासाठी कोणाकडेही गाड्या नव्हत्या. पायी चालत जाऊन, ठिकठिकाणी खळीने पोस्टर चिकटवून प्रचार केला जात होता.
गोविंदभाई आणि रफिक झकेरिया यांच्या भाषणात लोकशाही टिकली पाहिजे, रुजली पाहिजे, त्यासाठी निवडणुकीत प्रत्येकाने सहभागी होत हातभार लावण्याचे आवाहन केले जाई. कोणावरही व्यक्तिगत टीका केली जात नव्हती. कोणाला पोलिसांची भीती नव्हती. सगळे खेळीमेळीचे वातावरण होते. कोणी जात-पात काढत नव्हते. धर्माच्या नावावर मतदानही होत नसे, त्या प्रकारचा प्रचारही होत नव्हता. या निवडणुकीत गोविंदभार्इंचा पराभव झाला. या पराभवाचे थोडेही दु:ख, शल्य त्यांना नव्हते. निकालाच्या दुसऱ्या दिवशी गोविंदभाई स.भु. संस्थेत आपल्या कामाला लागले. तेव्हा ते अध्यक्ष नव्हते. मात्र, त्या ठिकाणाहूनच त्यांची विविध कामे चालत होती. रफिक झकेरिया यांनाही गोविंदभाई यांच्याविषयी प्रचंड आदर होता. विजयी झाल्यानंतर त्यांनीही तात्काळ गोविंदभार्इंची भेट घेतली. त्यानंतर दोघांनी अनेक कार्यक्रमांना एकत्रितपणे आवर्जून हजेरी लावली.
आम्ही रफिक झकेरिया यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यांना आम्हा युवकांचा ग्रुपही माहीत होता. तरीही आम्ही बोलावलेल्या कार्यक्रमांना ते हजेरी लावत. प्रेमाने बोलत. कटुता नावाचा प्रकारच नव्हता. कधीही विरोधकांची वागणूक मिळाली नाही. निवडणुका संपल्या की, सर्व संपून जायचे. हा काळच तसा होता. १९५७ साली सेलू येथे शाळेत शिकत असताना संयुक्त महाराष्ट्राच्या एकीकरणानंतर विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी शामराव बोधनकर, विनायकराव चारठाणकर, गीताबाई चारठाणकर यांचा आमच्यावर प्रभाव होता. नरहर कुरुंदकर, ना.य. डोळे, बापू काळदाते हेसुद्धा सेलूवरून येऊन व्याख्याने देत होती. तेव्हाच्या निवडणुकीत शिक्षकांच्या सांगण्यावरून शेकापचा प्रचार केला होता. या प्रचारात पोस्टर चिकटवणे, भाड्याने सायकल घेऊन संबंधिताला निरोप पोहचवणे, अशी कामे केली. सेलूत क्रांतीसिंह नाना पाटील, एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे आदींच्या सभा व्हायच्या. त्यातही लोकशाही रुजविण्यासाठी श्रीमंती, घराणेशाही असलेल्या उमेदवारांचा पराभाव करा, असे आवाहन नेत्यांकडून केले जायचे. विरोध हा तात्पुरता होता.
१९६२ साली औरंगाबादेत निवडणूक प्रचारात सहभागी झाल्यानंतर पुढे पुण्याला शिकण्यास गेलो. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा संबंध आला नाही; पण सद्य:स्थितीत लोकशाहीबद्दल खरंच चिंता वाटायला लागली आहे. आजच्या युवकांना स्वत:चे हक्क, लोकशाही याविषयी कोणतेही गांभीर्य उरले नाही. समाज तशा अर्थाने जागरूक झालाच नाही, अशी माझी ठाम धारणा झाली आहे. ७० वर्षांत रुजवलेली लोकशाही टिकली पाहिजे, वाढविली पाहिजे, असे वाटते.
( शब्दांकन : राम शिनगारे )