मी पाहिलेली निवडणूक....इंदिरा गांधी माझ्या प्रचारासाठी आल्या होत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 07:59 PM2019-03-28T19:59:44+5:302019-03-28T20:03:29+5:30

त्या जाहीर सभेत समोर एक लाखापर्यंत नागरिक उपस्थित होते. सभा जोरदार झाली.

The election I saw .... Indira Gandhi came for my election campaign | मी पाहिलेली निवडणूक....इंदिरा गांधी माझ्या प्रचारासाठी आल्या होत्या

मी पाहिलेली निवडणूक....इंदिरा गांधी माझ्या प्रचारासाठी आल्या होत्या

googlenewsNext

१९६२ साली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष विनायकराव पाटील, पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर यांच्यामुळे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बदनापूर जि.प. सर्कल-अंतर्गत पंचायत समिती गणाचे तिकीट मिळाले. बैलटांग्यातून प्रचार करून विजय मिळवला. माझ्या गटाचे ६ सदस्य निवडून आले. एकूण सदस्य संख्या १८ होती. सभापतीपदासाठी मी आणि बबनराव देशमुख उभे राहिलो. दोघांना प्रत्येकी ९ मते पडली. सभापतीपदासाठी टॉस झाला. त्यात विजय मिळाला. वयाच्या २१ व्या वर्षी बदनापूर पं.स.चा सभापती बनलो. तेव्हा राज्यात सर्वात कमी वयाचा सभापती म्हणून नाव नोंदवले.

सभापतीच्या कार्यकाळात बदनापूरमधून आमदारकीच्या तिकिटाचा दावेदार होतो. विनायकराव पाटील यांनी शब्दही दिला. त्याप्रमाणे तिकीट अंतिम झाले असताना काँग्रेसच्या गटबाजीत कापण्यात आले. तेव्हाच विधान परिषदेवर पाठविण्याचा शब्द विनायकराव पाटलांनी दिला. याच कालावधीत विनायकराव पाटलांचे निधन झाले आणि तो शब्द तसाच राहिला. पुढे बदनापूर जि.प.चा सदस्य बनलो. १९७२ साली औरंगाबाद जि.प.चे अर्थ व शिक्षण सभापतीपद मिळाले. १९७८ पर्यंत जि.प.चा सदस्य होतो.

आणीबाणी उठल्यानंतर १९७८ साली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. काँग्रेस पक्षात उभी फूट पडली होती. इंदिरा काँग्रेस आणि मूळ काँग्रेस. जनता दल-शेकाप आणि कम्युनिस्ट पार्टीचा जोर होता. बाबूराव काळे हे इंदिरा काँग्रेसमध्ये होते. त्यांनी बदनापूरमधून मला तिकीट दिले. मूळ काँग्रेसकडून दौलतराव पवार, शेकापकडून बाजीराव चव्हाण, समाजवादी पक्षाकडून शंकरसिंग बुंदेले आणि इंदिरा काँग्रेसकडून मी, अशी लढत झाली. माझ्या प्रचारासाठी खुद्द इंदिरा गांधी आल्या होत्या. अतिशय करारी बाण्याच्या इंदिराजींसोबत जालन्याहून बदनापूरपर्यंत प्रवास केला. गाडीतून उतरताच त्या सभास्थळी वेगवान पद्धतीने चालत गेल्या. त्या जाहीर सभेत समोर एक लाखापर्यंत नागरिक उपस्थित होते. सभा जोरदार झाली.

पोलिसांसह सुरक्षारक्षकांनी आलेल्या रस्त्याने इंदिरा गांधी यांनी न जाता गर्दीमुळे दुसऱ्या मार्गाने नेण्याचा निर्णय घेतला. हे त्यांना समजताच त्यांनी ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. ताफा जुन्या रस्त्याने फिरला. या रस्त्यावर हजारो माणसे जमली होती. सर्वांना अभिवादन करीत इंदिरा गांधी औरंगाबादच्या दिशेन ंरवाना झाल्या. या निवडणुकीत १४ हजार मतांनी विजय मिळाला. पुढे वसंतदादा मुख्यमंत्री बनले. त्यांचे सरकार पाडून शरद पवार मुख्यमंत्री झाले.

१९८० मध्ये इंदिरा गांधी बहुमताने पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांना इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची आॅफर दिली; पण ती शरद पवार यांनी धुडकावली. यामुळे त्यांनी विधानसभाच बरखास्त केली. यात आमची पाच वर्षांची आमदारकी आवघ्या दोन वर्षातच संपली. पुढे पक्षाने तिकीटही दिले नाही अन् आम्ही निवडणूकही लढवली नाही. पुढे सहकार क्षेत्रात बाळासाहेब पवार यांच्यासोबत ेरामनगर येथे जालना सहकारी साखर कारखाना उभारला. यासाठी १० कोटी रुपये खर्च आला. हे पैसे पहिल्या अडीच वर्षात फेडले. आज त्या कारखान्यावर १०० कोटींचे कर्ज आहे. आजचे राजकारण पाहिले की, जुने दिवस आठवून वाईट वाटते.

( शब्दांकन : राम शिनगारे )

Web Title: The election I saw .... Indira Gandhi came for my election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.