मी पाहिलेली निवडणूक...तेव्हा प्रचारात कधीही जात-धर्म निघाली नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:47 PM2019-04-01T12:47:57+5:302019-04-01T12:51:56+5:30

१९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी विजय मिळविला.

A election i saw...I never saw caste and religion in the election | मी पाहिलेली निवडणूक...तेव्हा प्रचारात कधीही जात-धर्म निघाली नाही 

मी पाहिलेली निवडणूक...तेव्हा प्रचारात कधीही जात-धर्म निघाली नाही 

googlenewsNext

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यामुळे जनतेत प्रचंड रोष होता. देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले होते. १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह त्यांच्या पक्षाची धुळधाण उडाली. ही निवडणूक मला आठवते.

इंदिरा गांधी यांचा पराभव करून १९७७ साली मोरारजी देसाई पंतप्रधान  बनले. मात्र, त्यांचे खिचडी सरकार अल्पायुषी आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले. यातच या सरकारचा शेवट १९८० साली झाला. इंदिरा गांधी यांनी पराभवानंतर राष्ट्रीय काँग्रेसऐवजी इंदिरा (आय) काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. आय काँग्रेसकडून काझी सलीम यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात एस काँग्रेसचे साहेबराव पाटील डोणगावकर होते. या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली. दोघेही धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. प्रचारात दोन्ही गटांकडून एकदाही जात, धर्म काढण्यात आला नाही.  दोघेही कॉर्नर बैठका घेत प्रचार करीत. छोट्या-छोट्या सभांसह मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावरच भर होता. त्यात कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश नव्हता. ही निवडणूक काझी सलीम यांनी जिंकली. डोणगावकरांचा पराभव झाला. 

१९८४ साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. तेव्हा राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले अब्दुल अझीम यांना आय काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. एस काँग्रेसकडून पुन्हा साहेबराव पाटील डोणगावकर यांना तिकीट मिळाले. याच निवडणुकीत अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान आणि जोगेंद्र कवाडे यांनी स्थापन केलेल्या दलित मुस्लिम अल्पसंख्याक सुरक्षा महासंघ पक्षाकडून राज्यात एकमेव उमेदवार देण्यात आला. या उमेदवाराचे नाव खलील जाहेद, असे होते. राज्यात कोठेही उमेदवार न दिल्यामुळे औरंगाबादेतच कशासाठी उमेदवार दिला, अशी चर्चा तेव्हा केली जात होती.

काँग्रेसमधील एका गटानेच मताचे विभाजन होण्यासाठी हाजी मस्तान यांना गळ घातल्याचे त्यांनी माझ्याशी केलेल्या चर्चेत सांगितल्याचे आठवते. यात मुस्लिम मताचे विभाजन झाले. साहेबराव पाटील डोणगावकर हेसुद्धा धर्मनिरपेक्ष भूमिका घेणारे होते. मात्र, मुस्लिम मतांमध्ये फूट पडत असताना त्यांनीही हिंदू मते स्वत:कडे वळविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. औरंगाबादच्या इतिहासात हिंदू-मुस्लिम अशी जात-धर्माच्या नावावर पहिल्यांदाच ही निवडणूक झाली. यात साहेबराव पाटील डोणगावकर यांना विजय मिळाला. मंत्री असताना अब्दुल अझीम यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरही ते सत्ता असेपर्यंत मंत्रीपदावर कायम होते.

पुढे औरंगाबादेत शिवसेनेचा प्रभाव वाढू लागला. मोरेश्वर सावे यांनी एका भागात पाणी कमी येते म्हणून पालिकेच्या उपायुक्तांना काळे फासले.  हे प्रकरण  राज्यभर गाजले. या घटनेनंतर १९८८ साली झालेल्या महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेने हिंदू धर्माच्या नावावर जोरदार मुसंडी मारत ६० पैकी २९ नगरसेवक निवडून आणले. काँग्रेस, मुस्लिम लीग आणि आरपीआय या तीन पक्षांचे ३१ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचा महापौर बनला. मुस्लिम लीगकडून मला उपमहापौर म्हणून संधी मिळाली. त्या निवडणुकीवर शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. सेनेच्या नगरसेवकांनी मतदानपेटी उचलून नेली होता. तेव्हापासून  हिंदू-मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू आहे.

( शब्दांकन : राम शिनगारे )

Web Title: A election i saw...I never saw caste and religion in the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.