कमोडचा रंग असा का? तुमची श्रेणी कोणती? निवडणूक निरीक्षकाच्या जाचाला अधिकारी वैतागले
By विकास राऊत | Published: May 2, 2024 01:51 PM2024-05-02T13:51:51+5:302024-05-02T13:52:38+5:30
या निरीक्षकाबाबत जालना जिल्हा प्रशासनाने एक गोपनीय अहवाल निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांना पाठविला असल्याचे समजते.
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन निवडणूक आयोग करीत असताना आयोगाने नेमलेले निवडणूक निरीक्षक मात्र सहलीवर आल्यासारखे वागू लागले आहेत.
जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक राजेशकुमार यांनी विश्रामृहातील कमोडच्या रंगावरून बांधकाम विभागाच्या अभियंत्याची खरडपट्टी केली. सुभेदारी विश्रामगृहातील बाथरूममध्ये ग्रे रंगाऐवजी पांढऱ्या रंगाचे कमोड का? बेसीन वेगळ्या रंगाचे का? फ्लशला प्रेशरने पाणी येत नाही, एअर फ्रेशनर का नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती करून लायझनिंगला असलेल्या अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. निरीक्षकांच्या अशा जाचाला अधिकारी वैतागले आहेत. निरीक्षक राजेशकुमार यांची व्यवस्था प्रारंभी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलात करण्यात आली होती. तिथेही त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातल्याचे समजते. याबाबत हॉटेल व्यवस्थापनाने तक्रार दाखल केलेली नाही. या निरीक्षकाबाबत जालना जिल्हा प्रशासनाने एक गोपनीय अहवाल निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांना पाठविला असल्याचे समजते.
राजेशकुमार हे यंत्रणा कुचकामी असल्याचे बोलून अधिकाऱ्यांचा अवमान करीत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दिमतीला असलेल्या अधिकाऱ्यांची श्रेणी कोणती आहे, यावरून विचारणा करीत आहेत. रात्री-अपरात्री फोन करून त्रास देत आहेत. त्यांच्या गैरहजेरीत एखादी प्रक्रिया पूर्ण केली तर त्यावरून झापत असतात. या सगळ्या बाबींमुळे एकेक काम दोनवेळा करण्याची वेळ यंत्रणेवर येत आहे. निवडणूक कामाला गैरहजर राहिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित का केले नाही. यावरूनही निरीक्षकांनी यंत्रणेला धारेवर धरले. फॉर्म बारा ड चे दोन वेळा करण्यास भाग पाडले. राजकीय पक्ष प्रतिनिधी बैठकीला आल्यानंतर त्यांचीही निरीक्षकांनी उलट चौकशी केली. या तक्रारींविषयी निवडणूक निरीक्षक राजेशकुमार यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी फोन घेतला नाही.
उत्तराखंडमध्येही दिली होती तक्रार...
२०२३ मध्ये राजेशकुमार हे उत्तराखंडमध्ये बागेश्वर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक असताना भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
व्हिसीमध्येही तक्रारींचा पाढा.....
आयोगाच्या व्हिसीमध्ये निवडणूक निरीक्षकांनी जालना मतदारसंघातील जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार केली. फुलंब्री, सिल्लोड, पैठण हे विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडेही सहायक निवडणूक अधिकारी निरीक्षकांबाबत तक्रारी करीत आहेत. याबाबत उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांना विचारले असता, त्यांनी हा विषय सचिव बनसोडे यांच्या अखत्यारित असल्याचे सांगून हात झटकले.
समन्वय ठेवण्याचा प्रयत्न...
काही बाबी गोपनीय असतात, त्या सांगता येत नाहीत. निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. प्रशासन निरीक्षकांशी पूर्णत: समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
- श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी जालना